Friday, October 31, 2025
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी! वर्षातून एकदाच 'टीईटी'; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 'या' शिक्षकांना २ वर्षात...

मोठी बातमी! वर्षातून एकदाच ‘टीईटी’; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘या’ शिक्षकांना २ वर्षात ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावीच लागणार, अन्यथा कायमचे घरी बसावे लागणार

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गावरील ५२ वर्षांपर्यंतच्या शिक्षकांना दोन वर्षात ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे. दरवर्षी एकदाच ‘टीईटी’ होत असल्याने राज्यभरातील शिक्षकांनी २३ नोव्हेंबरला होणाऱ्या ‘टीईटी’साठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

शिक्षक भरतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) फेब्रुवारी २०१३ पासून बंधनकारक झाली. त्यापूर्वी शिक्षक भरतीसाठी ‘डीएड’चे गुण महत्त्वाचे होते. आता सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार आठवीच्या वर्गांपर्यंत शिकविणाऱ्या शिक्षकांना दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण करावी लागणार आहे. सेवानिवृत्तीला सहा वर्षे कमी म्हणजेच ५२ वर्षाच्या आतील त्या सर्व शिक्षकांसाठी हा आदेश बंधनकारक आहे. दरम्यान, या निर्णयासंदर्भात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करेल, अशी शिक्षकांना आशा आहे. त्यामुळे अनेकजण २३ नोव्हेंबरच्या ‘टीईटी’साठी अर्ज करायचे की नाही, या संभ्रमात आहेत.

 

पण, राज्य सरकारने अजूनही त्यावर कोणतीही भूमिका घेतली नसून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य सरकार जाणार नाही, असे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे दरवर्षी शिक्षक भरतीसाठी इच्छुकांचे अर्ज असायचे, पण यंदा शिक्षक देखील ‘टीईटी’साठी अर्ज करत आहेत. अर्ज करण्यासाठी ३ ऑक्टोबरपर्यंत असून यंदा परीक्षेसाठी पाच लाखांपर्यंत अर्ज येतील, असा अंदाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परीक्षेकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, काही शिक्षक स्वत:च्या मुलांसोबत किंवा त्यांनी शिकविलेल्या विद्यार्थ्यांच्या बरोबर देखील परीक्षेला बसतील, अशी स्थिती असणार आहे.

 

वर्षातून एकदाच टीईटी

 

वेळापत्रक निश्चित करून परीक्षा फॉर्म भरायला वेळ देणे, अर्जांची छाननी करणे, प्रवेशपत्र तयार करून वितरीत करणे, प्रश्नपत्रिका व परीक्षा केंद्रे निश्चित करणे आणि परीक्षा घेतल्यावर उत्तरपत्रिका तपासून निकाल, असे परीक्षेचे टप्पे असतात. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडूनही उत्तीर्णांच्या उत्तरपत्रिका पडताळल्या जातात. त्यामुळे ‘टीईटी’ची परीक्षा वर्षातून एकदा होऊ शकते. २३ नोव्हेंबरला ‘टीईटी’ झाल्यावर पुढच्या वर्षी तेव्हाच्या परीक्षेचे नियोजन केले जाईल.

 

– डॉ. नंदकुमार बेडसे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

 

‘टीईटी’ अर्जाची सद्य:स्थिती

 

अपेक्षित अर्ज

 

५ लाख

 

१५ ते २६ सप्टेंबरपर्यंत अर्ज

 

१.०८ लाख

 

अर्ज करण्यासाठी मुदत

 

३ ऑक्टोबरपर्यंत

 

परीक्षेची तारीख

 

२३ नोव्हेंबर २०२५

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -