देशातील कोचिंग हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानातील (Rajasthan) कोटा जिल्ह्यात (Kota District) एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एका फ्लॅटला आग लागल्यामुळे बॉलिवूड अभिनेत्रीच्या (Bollywood Actress) दोन मुलांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. फ्लॅटला लागलेल्या भीषण आगीत गुरमरुन मृत्यूमुखी पडलेल्या अभिनेत्रीच्या दोन मुलांपैकी एक मुलगा टेलिव्हिजनवरचा सुपरस्टार चाईल्ड अॅक्टर होता. त्यानं ‘वीर हनुमान’ या गाजलेल्या टीव्ही सीरिअलमध्ये लक्ष्मणची भूमिका साकारली होती.
मिडिया रिपोर्टनुसार, कोटा येथील अनंतपुरा येथील दीपश्री बहुमजली इमारतीत शनिवारी रात्री उशिरा ही आग लागल्याची घडना घडली. काही वेळातच आग संपूर्ण फ्लॅटमध्ये पसरली. मृत मुलांची ओळख पटली असून 10 वर्षीय टीव्ही चाईल्ड अॅक्टर वीर शर्मा आणि त्याचा मोठा भाऊ 15 वर्षीय शौर्य शर्मा यांचा आगीत गुदमरुन मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.
आगीत मृत्यूमुखी पडलेल्या मुलांची आई रीता शर्मा ही एक बॉलीवूड अभिनेत्री असून त्यांचे वडील जितेंद्र शर्मा हे कोटा येथील एका खाजगी कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये फॅकल्टी मेंबर म्हणून काम करतात. अपघाताच्या वेळी, वडील एका भजन संध्यासाठी गेले होते, तर आई मुंबईत होती.
फ्लॅटमधून धूर येत असल्याचं पाहून शेजाऱ्यांनी तोडलं दार
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या चौथ्या मजल्यावरच्या फ्लॅट नंबर 403 मध्ये आग लागल्यानं दोन्ही मुलांचा गुदमरुन मृत्यू झाला. शेजाऱ्यांन फ्लॅटमधून धूर येत असल्याचं दिसलं आणि त्यांनी लगेचच दरवाजा तोडून मुलांना बाहेर काढलं. त्यावेळी दोन्ही मुलं बेशुद्ध पडली होती. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी सांगितलं की, ड्रॉइंग रूम पूर्णपणे जळून खाक झाली होती आणि घराच्या इतर भागातही आग लागल्याचं दिसत होतं.
वीरनं ‘वीर हनुमान’ सीरिअलमध्ये साकारलेली लक्ष्मणाची भूमिका
वीरनं ‘वीर हनुमान’ या धार्मिक सीरिअलमध्ये लक्ष्मणची भूमिका साकारली होती. सैफ अली खानच्या आगामी चित्रपटातही तो सैफच्या बालपणाची भूमिका साकारणार होता. शौर्य आयआयटीची तयारी करत होता. या अपघातामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.




