महिला क्रिकेटमध्ये भारतीय संघ गेल्या काही वर्षात चांगली कामगिरी करत आहे. आतापर्यंत महिला क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा दबदबा होता. पण भारतीय महिला संघ आता कुठेच कमी नाही. यंदा भारतीय संघ वनडे वर्ल्डकप विजेतेपदासाठी दावेदार मानला जात आहे. भारत आणि श्रीलंकेत ही स्पर्धा होत असल्याने होम अॅडव्हान्टेज असणार आहे. त्यात भारतीय संघ फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका 2-1 गमावली असली तरी भारतीय क्रिकेटपटूंनी चांगली खेळी केली. त्यामुळे या स्पर्धेत भारतीय संघ चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. भारताचा या स्पर्धेतील पहिलाच सामना श्रीलंकेशी होत आहे. या सामन्यात विजयी मिळवून स्पर्धेला सुरुवात करेल, अशी क्रीडाप्रेमींची इच्छा आहे. दरम्यान, यंदाचा महिला वनडे वर्ल्डकप वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. त्याचं कारण म्हणजे बक्षिसाची रक्कम…आयसीसीने बक्षिसाच्या रक्कमेत 297 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे विजेत्या संघाला मोठी रक्कम मिळणार आहे.
महिला वनडे वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाला जवळपास 40 कोटींची रक्कम मिळणार आहे. तर उपविजेत्या संघाला त्याच्या निम्मी म्हणजेच जवळपास 20 कोटी मिळणार आहेत. उपांत्य फेरीत स्थान मिळवणाऱ्या संघाला जवळपास 10 कोटी रुपये मिळतील. पाचव्या आणि सहाव्या स्थानावर असलेल्या संघाला 6 कोटी मिळतील. तर सातव्या आणि आठव्या स्थानावर असलेल्या संघाला अडीच कोटी रुपये मिळतील. दुसरीकडे, या स्पर्धेत भाग घेतलेला संघ जिंको किंवा हरो त्या संघाला कमीत कमी 2 कोटी 50 लाख रुपये मिळणार आहेत. त्यामुळे आयसीसीने बक्षिसाची रक्कम वाढवल्याने स्पर्धेची रंगत वाढली. बक्षिसाची रक्कम दोन वर्षांपूर्वी भारतात झालेल्या आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषकापेक्षा जास्त आहे. महिला क्रिकेटला चालना देण्यासाठी आयसीसीने पाऊल उचललं आहे.
आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेत भारताचे सामने
30 सप्टेंबर, मंगलवार: भारत vs श्रीलंका
5 ऑक्टोबर, रविवार: भारत vs पाकिस्तान
9 ऑक्टोबर, गुरुवार: भारत vs दक्षिण अफ्रीका
12 ऑक्टोबर, रविवार: भारत vs ऑस्ट्रेलिया
19 ऑक्टोबर, रविवार: भारत vs इंग्लैंड
23 ऑक्टोबर, गुरुवार: भारत vs न्यूजीलैंड
26 ऑक्टोबर, रविवार: भारत vs बांग्लादेश




