शहरातील कासमवाडी परिसरात जुन्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी (दि.३) मध्यरात्री 12.30 च्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर उर्फ नाना भिका पाटील (वय २७, रा.कासमवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत नाना पाटील याचा परिसरातील काही तरुणांसोबत जुना वाद होता. गुरुवारी (दि.2) रात्री तो कासमवाडीतील एकता मित्र मंडळाजवळ उभा असताना दोन जणांनी त्याच्यावर धारदार तलवार व कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात नाना पाटील याच्या पोटावर व मांडीवर गंभीर वार झाले. गंभीर जखमी नाना यांना नातेवाईकांनी तातडीने खाजगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलिस अधिकारी नितीन गणपुरे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड व पीएसआय चंद्रकांत धनके यांनी रुग्णालयात धाव घेतली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.2) रात्री रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
