मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात विषारी खोकल्याच्या सिरपमुळे अनेक बालमृत्यू झाल्याच्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणात मोठी कारवाई करत प्रशासनाने डॉ. प्रवीण सोनी यांना अटक केली असून, त्यांच्यावर बेकायदेशीरपणे सिरप लिहून देण्याचा आरोप आहे.
तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, ‘कोल्ड्रिफ’ (Coldrif) सिरपमध्ये ४८.६ टक्के विषारी डायइथिलीन ग्लायकोल (DEG) आढळले आहे. हे रसायन अँटिफ्रीज आणि ब्रेक फ्लूईडमध्ये वापरले जाते आणि ते केवळ मुलांसाठीच नव्हे, तर प्रौढांसाठीही घातक ठरते. या घटनेमुळे औषधांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
छिंदवाडा जिल्ह्यातील परासिया तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या एका महिन्यात (सप्टेंबर ७ पासून) अनेक मुलांना साधा ताप आणि खोकला आला. स्थानिक डॉक्टरांनी ‘कोल्ड्रिफ’ सिरप लिहून दिला, पण मुलांच्या प्रकृतीत झपाट्याने बिघाड झाला. मूत्रपिंड (किडनी) निकामी होऊन उलटी, सूज आणि मूत्रविकार होऊ लागला. अनेक मुलांना नागपूरच्या रुग्णालयात हलवण्यात आले, पण उपचारादरम्यान मृत्यू झाले. जिल्ह्यातील ११ मुलांचा मृत्यू झाला असून, राजस्थानमध्येही ३ समान प्रकरणे समोर आली आहेत. एकूण १४ बालमृत्यूंचा आकडा असल्याचे वृत्त आहे.
जिल्हाधिकारी हरेंद्र नारायण यांनी सांगितले की, तामिळनाडूच्या प्रयोगशाळेतील तपासणीत ‘कोल्ड्रिफ’ सिरप (बॅच नं. SR-13, मे २०२५ मध्ये तयार) मध्ये १ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे असेलं डायइथिलीन ग्लायकोल (DEG) चे प्रमाण ४८.६ टक्के आढळले. हे रसायन किडनी फेलियर आणि मृत्यूचे कारण ठरते. चार मुलांची रेनल बायोप्सी करण्यात आली, ज्यात अत्यंत गंभीर नुकसान दिसले.
जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले, “मृत्यूचे कारण स्पष्ट आहे. शवविच्छेदनाची गरज नाही, कारण विषारी घटकांच्या जास्त प्रमाणामुळे हे घडले.” राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) आणि ICMR च्या तज्ज्ञांनी नमुने गोळा केले असून, CDSCO ने सहा राज्यांतील औषध उत्पादन केंद्रांची तपासणी सुरू केली आहे.
अखेर डॉ. सोनी यांना अटक
या प्रकरणात मुख्य आरोपी डॉ. प्रवीण सोनी, परासिया येथील सिव्हिल हॉस्पिटलमधील बालरोगतज्ज्ञ, अटकेत आहेत. ते सरकारी नोकरीसोबत खासगी क्लिनिक चालवत असल्याचे समोर आले. बहुतेक मृत मुलांना त्यांनीच ‘कोल्ड्रिफ’ सिरप लिहून दिला होता. ब्लॉक मेडिकल ऑफिसर अंकित सल्लम यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.






