गुंतवलेल्या 34 हजार रुपयांवर 75 दिवसांनंतर 54 हजारांचा परतावा देण्याचे आमिष दाखवून 2 कोटी 95 लाख 25 हजार 44 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
मदनकुमार बाळासाहेब शिंदे (रा. कौलगे, ता. गडहिंग्लज) यांनी गडहिंग्लज पोलिसात फिर्याद दिली आहे. या घटनेने खळबळ माजली आहे.
याप्रकरणी रणजित रावण (रा. मुरगूड, ता. कागल) अमोल चौगुले (रा. चिमगाव, ता कागल) वैशाली गुरव (रा. हलकर्णी, ता. गडहिंग्लज) श्रीकांत आचार्य (श्रीमंता बझार कंपनीचे सर्वेसर्वा रा. पुणे), सदाशिव चव्हाण (रा. पिंपळगाव, ता. भुदरगड), संतोष भोसले, (रा. औरनाळ, ता. गडहिंग्लज) तुषार चोथे (रा. गडहिंग्लज), दिनेश भटनागर (अकौंटंट श्रीमंता बझार रा. पुणे), धर्मेंद्र सिंगर (रा. मध्य प्रदेश), विठ्ठल जाधव (रा. गडहिंग्लज), रमेश शिरगावे (रा. हेब्बाळ गडहिंग्लज) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
गडहिंग्लजमध्ये श्रीमंता बझारच्या नावाखाली गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याने याबाबतचा तक्रार अर्ज दिल्यानंतर पोलिसांनी चौकशी करत 11 संशयितांवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून जिल्ह्यासह राज्यातील अनेकांची फसवणूक झाल्याची परिसरात चर्चा आहे.

