सध्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांकडून याबद्दलचे प्लॅनिंग केले जात आहे. त्यातच आता आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मोठ्या तयारीला लागली आहे. महायुतीमध्ये वर्चस्व सिद्ध करण्याच्या उद्देशाने शिवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी मेगा प्लॅनिंग सुरू करण्यात आले आहे. यानुसार किती आणि कोणत्या जागा शिवसेना लढवणार याबद्दलही चर्चा केली जात आहे.
जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्यावरही भर
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेने निवडणुकीत तब्बल ११५ ते १२० जागांचा प्रस्ताव महायुतीतील आपल्या मित्रपक्षांना देण्याची तयारी केल्याचे बोललं जात आहे. शिवसेना शिंदे गटाकडून मुंबई महापालिका निवडणुकीत फक्त चांगल्या जागा लढवण्याचेच नव्हे, तर महायुतीचा महापौर करण्याचे स्पष्ट लक्ष्य ठेवले आहे. यासाठी पक्षाकडून मतदारसंघांनुसार रणनीती आखली जात आहे. मुंबईतील स्थानिक पातळीवर संघटना मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. तसेच जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्यावरही भर दिला जात आहे.
महायुतीमध्ये जागावाटपावर लवकरच चर्चा सुरु होणार आहे. त्याआधीच शिवसेनेकडून ११५ ते १२० जागा लढवण्याचा प्रस्ताव तयार ठेवण्यात आला आहे. मुंबई महापालिकेत एकूण २२७ जागा आहेत. त्यामुळे शिवसेनेने इतक्या मोठ्या प्रमाणात जागांची मागणी केली तर महायुतीतील इतर मित्रपक्ष नाराज होऊ शकतात, असे बोललं जात आहे. त्यामुळे भाजपसोबत जागावाटपावर मोठी चर्चा होण्याची शक्यता आहे.
शिंदे गटासाठी निकाल महत्त्वाचा
यापूर्वी भाजप आणि अविभाजित शिवसेनेने समसमान जागा लढवल्या होत्या. मात्र, आता शिवसेनेमध्ये झालेल्या फुटीनंतर आणि महायुतीतील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे हे जागावाटप अत्यंत गुंतागुंतीचे होण्याची शक्यता आहे. बंडखोरीनंतर होणारी ही पहिलीच मोठी पालिका निवडणूक असल्यामुळे, या निवडणुकीचा निकाल शिंदे गटासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
शिंदे गट पूर्ण ताकदीने उतरणार
दरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या या प्लॅनिंगमुळे विरोधकांना घाम फुटला आहे. मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकवण्यासाठी शिवसेना शिंदे गट पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे पाहायला मिळत आहे. आता भाजप आणि अन्य मित्रपक्षांसोबत जागावाटपाची चर्चा आता कशी पुढे सरकते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




