मनसे प्रमुख राज ठाकरेंना सोबत घेण्यावरून आता महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाल्याचे चित्र उभे राहिले आहे. महाविकास आघाडीत राज ठाकरे यांना घेण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याचा ठाकरेंच्या शिवसेनेने जोरदार विरोध केला आहे. या मुद्द्यावर निर्णय घेण्याचे अधिकार मुळात हर्षवर्धन सपकाळांना आहेत का?, असा थेट सवाल आता ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे. ते अकोला येथे बोलत होते.
राज ठाकरेंना सोबत न घेण्याचा हा काँग्रेसचा विचार असेल. परंतु, राज ठाकरेंना सोबत घेण्याचा आमचा विचार पक्का झाल्याचंही यावेळी खासदार सावंत यांनी म्हटले आहे. दरम्यान युती संदर्भात बोलताना दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की आम्ही सोबत आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठीच, उद्धव ठाकरे यांच्या या विधानाची देखील सावंत यांनी यावेळी आठवण करू दिली. दरम्यान राज ठाकरेंच्या मुद्द्यावरून काँग्रेसला सोडणार का? या प्रश्नावर बोलतांना ते म्हणाले की, याचा निर्णय उद्धव ठाकरे घेणार आहेत. मात्र राज ठाकरेंसोबत जाण्याचा शिवसेनेचा निर्णय पक्का झाला आहे, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकावरून झालेल्या वादावर प्रतिक्रिया देताना सावंत यांनी जोरदार टीका केली आहे. प्रबोधनकारांचे पुस्तक फेकणारी आणि सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ला करणारी प्रवृत्ती एकच आहे, या घटनेमुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा ऱ्हास झाला आहे, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
उद्या शिवसेनेच्या चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या अंतिम सुनावणीवरही त्यांनी यावेळी भाष्य केले आहे. मुळात या विषयावर अंतिम सुनावणी ही माजी सरन्यायाधीश चंद्रचुड यांच्या कार्यकाळातच होणं अपेक्षित होतं, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मातोश्रीला भेट दिली होती, त्यानंतर आता युती होणार असल्याच्या चर्चेचा जोर आणखी वाढला आहे.