गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाचा सुरू असलेला दणका थांबायचे नाव घेत नाही. गुरूवारी रात्री अवकाळीने जोरदार दणका दिला . इस्लामपूर वाळळयात सर्वाधिक पावसाची नोंद करत आष्टा मंडलात ढगफुटीसदृश तर बहे मंडलात अतिवृष्टी झाली आहे .
गुरूवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने सांगलीकरांची तारांबळ उडाली. पावसाचे आणि तुंबलेल्या नाल्याचे पाणी घरात शिरल्याने अनेक भागात नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. दोन दिवस वातावरणात प्रचंड उष्मा निर्माण झाला आहे. गुरूवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरूवात झाली. सांगली, मिरजेला सुमारे तासभर पावसाने झोडपले.
तर जत, वाळवा, इस्लामपूर, शिराळा, पलूस आणि कडेगाव तालुक्यात अनेक भागात जोरदार पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस वाळवा तालुक्यात ३९.६ मिमी झाला आहे. यामध्ये आष्टा मंडलात १११, बहे मंडलात ८८, वाळव्यात ४०, पेठमध्ये ५४, कासेगाव मंडलात ४३, चिकुर्डे, कामेरी मंडलात ४२ मिमी पाऊस झाला आहे.
मिरज तालुक्यातील कसबेडिग्रज, सांगली, मिरज, कवठेपिरान, कुपवाड मंडलात जोरदार पाऊस झाला आहे. तर तासगाव तालुक्यात विसापूर मंडलात झालेली रिमझिम वगळता अन्य ठिकाणी पाऊस झाला नाही. शिराळा तालुक्यातही सर्वच मंडलात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.
सागाव, चरण, मांगले, शिराळा मंडलात २५ मिमी पेक्षा जादा पावसाची नोंद झाली आहे. तर जत, आटपाडी आणि कवठेमहांकाळ तालुक्यात पावसाने उघडीप दिली. पलूस तालुक्यात सरासरी १३.८ तर कडेगाव तालुक्यात १३.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.