कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने इसमाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पीडित इसमाने पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रार देत ठोस कारवाईची मागणी केली आहे.
हिंगणघाट येथील संत तुकडोजी वार्डातील रहिवासी नरेंद्र उभाटे यांनी सांगितले की, त्यांना बजाज फायनान्स कंपनीच्या कार्यालयातून फोन आला होता. पॉलिसी गहाण ठेवून २० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले. या आधारावर उभाटे यांनी २ लाख रुपये देऊन पॉलिसी घेतली. २० दिवसांत कर्ज मिळेल असे त्यांना सांगण्यात आले.
त्यासाठी त्यांच्या नावाने काही कागदपत्रे मागवण्यात आली. कर्ज मंजूर झाल्याचे सांगून जीएसटीच्या नावाखाली १.५ लाख रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानंतर बँकिंग प्रोसेसिंगसाठी १.३५ लाख रुपये मागण्यात आले. ही रकमही उभाटे यांनी अदा केली.
त्यानंतर ‘हेड ऑफिस’मध्ये पैसे भरावे लागतील, असे सांगून पुन्हा १ लाख रुपये मागण्यात आले. अशाप्रकारे नरेंद्र उभाटे यांनी ५ लाख ८५ हजार रुपये भरले. मात्र, सतत फोन करूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. सात महिने उलटून गेले.
आपण कार्यालयाचे उंबरठे झिजवले. पण, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आपण दोन्ही पॉलिसी विड्रॉल करून २ लाख ८५ हजार रुपये परत मिळवले. मात्र, अजूनही आपल्याला बजाज फायनान्स कंपनीकडून ३ लाख रुपये मिळणे बाकी आहे. कंपनी टाळाटाळ करत असून, कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याचे उभाटे यांनी सांगितले. फायनान्स कंपनीने केलेल्या फसवणूक प्रकरणी कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.




