गेल्या दोन वर्षांपासून चालू असलेलं इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अखेर थांबवलेलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे युद्ध थांबावे म्हणून प्रयत्नरत होते. अखेर त्यांनी आणलेल्या 20 कलमी शांतता करारावर हमास आणि इस्रायल या दोघांनीही सहमती दाकवली आणि हमासकडून ओलीस ठेवलेल्या 20 जिवंत इस्रायली नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, या ऐतिहासिक घटनेनंतर भारताने मात्र आपली कुटणीती पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.
मोदींनी केले डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक
हमासने बंदी असलेल्या 20 इस्रायली नागरिकांची सुटका करताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या सोशल मीडियावर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी भारता हमास-इस्रायल युद्ध, हे युद्ध थांबवण्यासाठी घडवून आणलेला शांतता करार यावर भाष्य केले. विशेष म्हणजे मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन न्यातान्याहू यांची स्तुती केली. शांतता घडवू आणण्याच्या प्रक्रियेचे त्यांनी स्वागत केले आहे. दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून बंदी असलेल्या कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. त्यांची आम्ही स्वागत करतो. या काळात कैद्यांच्या कुटुंबीयांनी दाखवलेले धैर्य, धाडस, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रामाणिक आणि अविरत मेहनतीलाही त्यांचे हे दोन वर्षांचे स्वातंत्र्य समर्पित आहे, असे मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
मोदींच्या ट्विटचा अर्थ काय?
इस्रायल-हमास असो किंवा रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष असो, भारताने नेहमीच शांततेच्या आणि संवादाच्या मार्गाने तोडगा काढण्याच्या प्रयत्नांना समर्थन दिलेले आहे. भारताची तशी भूमिका राहिलेली आहे. परंतु रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र भारतावर टॅरिफ लादलेला आहे. याच कारणामुळे भारत आणि रशिया यांच्यातील संबंध काहीसे ताणलेले आहेत. हे संबंध पूर्ववत करण्यासाठी भारताकडून वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न केले जात आहेत. मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची प्रशंसा केली आहे. त्यामुळे मोदींचे हे ट्विट भारताच्या कुटनीतीचाही एक भाग असू शकते, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
दरम्यान, शांतता कराराच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यानंतर लवकरच या शांतता करारातील पुढच्या तरतुदींनुसार हमास आणि इस्रायलची पुढची वाटचाल चालू राहणार आहे. सध्यातरी हमासने कैद केलेल्या इस्रायलच्या नागरिकांची सुटका केल्याने युद्ध थांबले आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.