Friday, October 17, 2025
Homeमहाराष्ट्रबिबट्याची क्रूर शिकार! शेतात जनावरांची राखण करणाऱ्या शेतकऱ्याचा फडशा पाडला

बिबट्याची क्रूर शिकार! शेतात जनावरांची राखण करणाऱ्या शेतकऱ्याचा फडशा पाडला

नेहमीप्रमाणे आपल्या जनावरांना घेऊन शेतात गेलेल्या राजेंद्र विश्वनाथ गोल्हार (वय ३६) यांच्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करत त्यांचा फडशा पाडल्याची अत्यंत दुर्दैवी घटना आष्टी तालुक्यातील बावी, दरेवाडी परिसरात रविवारी रात्री उशिरा उघडकीस आली.

 

पोटाची खळगी भरण्यासाठी शेतात गेलेल्या एका सामान्य कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे असे विदारक अंत झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

 

रात्री उशिरा सुरू झाले शोधकार्य

रविवारी सकाळी गेलेले राजेंद्र गोल्हार रात्र झाली तरी घरी परतले नाहीत, यामुळे कुटुंबात चिंतेचे आणि भीतीने वातावरण निर्माण झाले. बिबट्याच्या हल्ल्याचा संशय येताच, कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी तातडीने शोधकार्य सुरू केले. वनविभाग, आष्टी प्रशासन, पोलीस आणि तब्बल दोनशे ते अडीचशे ग्रामस्थांनी एकत्र येत रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली. अखेर या शोधमोहिमेला यश आले, पण ते अत्यंत भयावह स्वरूपाचे होते.

 

विदारक दृश्याने गाव हादरले

रात्री उशिरा राजेंद्र गोल्हार यांचा मृतदेह आढळून आला. बिबट्याच्या क्रूर हल्ल्यामुळे मृतदेहाची स्थिती अत्यंत विदारक होती; त्यांच्या शरीराचा एक पाय मृतदेहाला नव्हता आणि गळ्याला गंभीर इजा झाली होती. हे दृश्य पाहणाऱ्या गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आणि परिसरात भीतीची भयावह शांतता पसरली. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार वैशाली पाटील, पोलीस निरीक्षक शरद भुतेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांच्यासह संपूर्ण प्रशासकीय ताफा घटनास्थळी दाखल झाला.

 

अंधारात बिबट्याचे संकट अधिक

या पार्श्वभूमीवर, आष्टी प्रशासनाने नागरिकांना रात्री अपरात्री घराबाहेर पडू नये आणि विशेषत: संध्याकाळनंतर एकट्याने फिरणे टाळावे, असे आवाहन केले आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी ‘लोकमत’ला माहिती देताना सांगितले की, या परिसरातील १५ गावांमध्ये विद्युत पुरवठा कायम ठेवण्यासाठी महावितरणशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. तसेच, बिबट्याचा वावर पाहता गस्त वाढवून जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. एक सामान्य शेतकरी बिबट्याच्या हल्ल्याला बळी पडल्याने आता बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -