राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मात्र या निवडणुकांपूर्वी पक्षांतराला वेग आल्याचं पहायला मिळत आहे, आतापर्यंत महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. महायुतीमध्ये सुरू असलेलं इनकमिंग अजूनही सुरूच आहे. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर अनेक बड्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिवसेना शिंदे गट आणि भाजपात प्रवेश केला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसच्या देखील अनेक नेत्यांनी आपल्या पक्षाची साथ सोडून भाजप आणि महायुतीमधील इतर पक्षात प्रवेश केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला लागलेली गळती अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये, पक्षप्रवेश सुरूच असल्यानं महायुतीमध्ये सुरू असलेलं हे इनकमिंग आता महाविकास आघाडीसाठी मोठी डोकदुखी ठरत आहे. पक्षाला लागलेली गळती रोखण्याचं मोठं आव्हान आता महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांसमोर असणार आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे सोपवला आहे. ते आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. दरम्यान ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. दिलीप चव्हाण हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्यानं हिंगोली जिल्ह्यात अजित पवार गटाची ताकद वाढणार आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, मात्र विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांना हे यश टिकवता आलं नाही, विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं, त्यानंतर महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झालं आहे, ते अजूनही सुरूच आहे. आतापर्यंत अनेक नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे.