कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आशा सेविकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. साडेचारशे आशा सेविकांना यंदा प्रत्येकी ५,००० रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार असून, या निर्णयामुळे आरोग्य सेवेत कार्यरत आशा वर्करांमध्ये(Asha workers) आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.
दरवर्षी KDMC आपल्या नियमित कर्मचाऱ्यांना २०,००० रुपयांचा भरघोस बोनस देत असते. मात्र यंदा सुरुवातीला आशा सेविकांना या योजनेतून वगळण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या नाराजीचा आवाज ठाकरे गटाच्या कामगार संघटनेने आणि कल्याण-डोंबिवली मुन्सिपल कर्मचारी कामगार सेनेने प्रशासनापर्यंत पोहोचवला.
कामगार संघटनेच्या सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर महानगरपालिकेने आशा सेविकांचा बोनस पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक महिन्यांपासून असंतुष्ट असलेल्या आशा वर्करांमध्ये समाधानाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.
मुन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष सचिन बासरे यांनी सांगितलं की, “महानगरपालिकेने आमच्या मागणीला प्रतिसाद देत साडेचारशे आशा सेविकांना(Asha workers) प्रत्येकी ₹५,००० बोनस देण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे त्यांच्या दिवाळीला खऱ्या अर्थाने उजाळा मिळाला आहे.”कोरोना काळात जनतेच्या आरोग्यासाठी दिवस-रात्र कार्यरत राहिलेल्या आशा सेविकांच्या कार्याचा गौरव या निर्णयातून होत असल्याचं सांगण्यात येत आहे. KDMC च्या या पावलाचं सर्वत्र स्वागत होत आहे.



