‘महादेवी’ हत्तीणीला वनतारा (Vantara) येथून हलवण्याच्या प्रक्रियेला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी हाय पॉवर कमिटी समोर अद्याप होऊ शकलेली नाही, कारण प्राणी कल्याण संस्था ‘पेटा’ (PETA) ने वनतारा आणि नांदणी मठाने सादर केलेल्या एकत्रित उत्तरावर आक्षेप घेतला आहे.
काय झालं?
महादेवी हत्तीणीला नांदणी मठातून वनतारा येथे पाठवण्याच्या संदर्भात वनतारा आणि नांदणी मठाच्या व्यवस्थापनाने एकत्रितपणे (एकच) उत्तर हाय पॉवर कमिटीसमोर सादर केले होते. दोन्ही पक्ष एकाच भूमिकेवर आल्यामुळे महादेवीला वनतारा येथे पाठवण्याचा मार्ग आता मोकळा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र पेटा संस्थेनं आक्षेप घेतल्यानं हाय पॉवर कमिटीसमोर आज होणारी सुनावणी झालीच नसल्याचं समोर आलं आहे.
पेटाचा नेमका आक्षेप काय?
पेटाने वनतासा आणि मठानं सादर केलेल्या संयुक्त उत्तरावर आक्षेप घेतला आहे. हा आक्षेप प्रामुख्याने महादेवी हत्तीणीचे आरोग्य आणि तिला असलेल्या आजारांच्या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नांशी संबंधित आहे. हत्तीणीच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल अधिक स्पष्टीकरण आवश्यक असल्याचा मुद्दा पेटाने उपस्थित केला आहे. या आक्षेपामुळेच कमिटीसमोरची नियोजित सुनावणी झाली नाही.
पुढं काय होणार?
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने हाय पॉवर कमिटीच्या अहवालानंतर हे प्रकरण पुन्हा कमिटीकडे वर्ग केले होते. सुनावणी न झाल्यामुळे, आता लवकरच हाय पॉवर कमिटीकडून पुढील सुनावणीची नवी तारीख जाहीर केली जाईल अशी माहिती समोर येत आहे. या नव्या तारखेला कमिटी काय निर्णय घेते आणि पेटाच्या आक्षेपांवर काय भूमिका मांडली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.