बोगस बिलांद्वारे केलेल्या 12 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळाप्रकरणी दिल्लीतील संबंधित कर सल्लागाराला जीएसटी विभागाने नोटीस दिली आहे. याप्रकरणी जीएसटी विभागाने कसून चौकशी सुरू केली आहे.
दिल्ली येथील गोविंद सिंग नामक व्यक्तीने पलूस तालुक्यातील रामानंदनगर येथील रामरहीम चौक या पत्त्यावर एस. आर. मेटल या नावाने फर्मची जीएसटी नोंदणी केल्याचे व बोगस बिलांद्वारे 12 कोटींचा जीएसटी घोटाळा केल्याचे निदर्शनास आले आहे. केंद्रीय जीएसटीच्या कोल्हापूर विभागाच्या अन्वेषण शाखेने शुक्रवारी रामानंदनगर येथे तपासणी केली असता, प्रत्यक्ष त्या ठिकाणी कोणतीही फर्म अस्तित्वात नसल्याचे समोर आले. एस. आर. मेटल या फर्मने 12 कोटी रुपयांच्या बनावट जीएसटी बिलांची निर्मिती करून ती पुढे सादर केली आहेत. ही फर्म फक्त कागदोपत्री अस्तित्वात ठेवून बनावट बिले तयार करण्यात आली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी केंद्रीय जीएसटी अन्वेषण विभाग, कोल्हापूर करत आहे.
दरम्यान, अधिक चौकशीतून या प्रकरणात दिल्लीतील एका कर सल्लागाराचाही सक्रिय सहभाग असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यानुसार संबंधित कर सल्लागाराला जीएसटी विभागाने नोटीस बजावली आहे, असे सूत्रांनी सांगितले. केंद्रीय जीएसटी विभागाने घोटाळ्याचा हा प्रकार गांभीर्याने घेतला आहे.