आशिया कप स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानला एकदा नाही तीनदा पराभवाची धूळ चारली. साखळी फेरीत, सुपर 4 फेरीत आणि अंतिम सामन्यातही पराभूत केलं. या स्पर्धेत भारताने पाकिस्तानसोबत हस्तांदोलन करणार नाही आणि पाकिस्तानच्या मोहसिन नक्वीच्या हातून ट्रॉफी घेणार नाही हे स्पष्ट केलं होतं. ठरल्याप्रमाणे भारतीय संघाने हस्तांदोलन केलं नाही आणि नक्वीच्या हातून ट्रॉफीही घेतली नाही. पण असं असताना मोहसिन नक्वी सर्व मर्यादा मोडत ट्रॉफी घेऊन पळ काढला. खरं तर ही ट्रॉफी दुसऱ्या कोणाच्या हातून देऊ शकला असते. पण त्यांनी तसं केलं नाही. इतकंच काय तर ट्रॉफी घेऊन पळ काढला. अजूनही भारतीय संघाच्या हाती ट्रॉफी मिळाली नाही. असं असताना बीसीसीआयने आक्रमक पवित्रा घेत मोहसिन नक्वीविरुद्ध मोर्चा उघडला आहे. दुसरीकडे, भारतीय संघाला ट्रॉफी मिळाली नाही तरी फायदा झाला आहे. बीसीसीआयने या स्पर्धेतून 100 कोटींची कमाई केली आहे. यामुळे पाकिस्तानला धक्का बसला आहे.
बीसीसीआयला इतकी रक्कम कशी काय मिळाली?
आशिया कप स्पर्धा युएईत होती. या स्पर्धेत बीसीसीआयने बक्कळ कमाई केली. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय दौऱ्यामुळे बीसीसीआयला 109.04 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. यात आशिया कप स्पर्धेची फी, टीव्ही राइट्स आणि आयसीसी टी20 आंतरराष्ट्रीय वर्ल्डकपमध्ये भाग घेतल्याने हा लाभ झाला आहे. मिडिया राइट्सच्या माध्यमातून 138.64 कोटी कमावले आहेत. तर आशिया कप स्पर्धेत भारत पाकिस्तान यांच्यात तीन सामने झाले. त्यामुळे ही कमाई वाढल्याचं प्रमुख कारण आहे. रिपोर्टनुसार बीसीसीआयला 2025-2026 च्या वार्षिक बजेटनुसार बोर्डाला वर्षाला जवळपास 6700 कोटी कमाई होण्याची अपेक्षा आहे.
बीसीसीआयची आर्थिक स्थिती मजबूत झाली आहे. पण टीम इंडियाला अजूनही ट्रॉफी काही मिळालेली नाही. मोहसिन नकवीच्या हेकेखोर वृत्तीमुळे ट्रॉफी एसीसी कार्यलयात बंद आहे. मात्र मोहसिन नकवी बीसीसीआयची कमाई काही रोखू शकले नाहीत. दुसरीकडे, आयपीएलच्या ब्रँड व्हॅल्यूत मात्र घसरण झाल्याचं दिसून आल आहे. आयपीएलच्या मागच्या दोन वर्षात नुकसान झाल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. आयपीएल 2025 स्पर्धेची ब्रँड व्हॅल्यू 76100 कोटी गणली गेली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यात घट दिसून आली आहे. मागच्या वर्षी 82700 कोटींची ब्रँड व्हॅल्यू होती. मात्र या दोन स्पर्धांची तुलना केली तर 6600 कोटींचं नुकसान झालं आहे.