अभिनेता आमिर खानचा ‘थ्री इडियट्स’ चित्रपट सर्वांनीच पाहिला असेल.या चित्रपटाच्या शेवटी ‘रँचो’ हे पात्र महिलेची प्रसुती करतो. रँचो हे पात्र इंजिनिअरिंग करीत असतो. मात्र, अभिनेत्री करिना कपूर जिचं पात्र डॉक्टरचं असतं. तिच्या सांगण्यावरून रँचो महिलेची प्रसुती करतो. शेवटी कसं सगळं ‘All is Well’ होतं. असाच एक प्रकार अयोध्येतून समोर आला आहे. आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातील एका तरूणानं डॉक्टर मैत्रिणीची व्हिडिओ कॉलद्वारे मदत घेऊन एका महिलेची रेल्वे स्थानक परिसरात प्रसुती केली आहे. आमदार रोहित पवार यांनी याचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये शेअर केला आहे.
विकास बेंद्रे असे खऱ्या आयुष्यातील ‘रँचो’चं नाव आहे. हा तरूण आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघातील रहिवासी आहे. श्री राम यांच्या दर्शनासाठी हा तरूण अयोध्येला गेला होता. दर्शनानंतर तरूण परतीच्या प्रवासाला निघाला. मात्र, परतीच्या प्रवासावेळी त्याच्या आयुष्यात एक अनपेक्षित प्रसंग आला. एका महिलेला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि परिस्थिती अत्यंत गंभीर झाली.
महिला विव्हळत असतानाही आजूबाजूला कुठेही डॉक्टर नव्हते. ॲम्बुलन्स मिळत नव्हती. अशा परिस्थितीत विकासने प्रसंगावधान राखत, एमर्जन्सी परिस्थितीला तोंड देण्याचं ठरवलं. त्याने लगेच आपल्या डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल केला. त्या मैत्रिणीने पायरीपायरीने प्रसूती प्रक्रिया कशी करावी हे समजावलं, आणि विकासने नेमकं तसंच केलं.
काही क्षणांतच बाळाचा जन्म झाला आणि आई-बाळ दोघेही सुखरूप असल्याचं पाहून सर्वांना दिलासा मिळाला. प्रसूती सुखरूप आणि व्यवस्थितपणे पार पडल्यानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू आणि ऑल इज वेलची भावना पाहायला मिळाली. हा प्रसंग अगदी ‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील आमिर खानच्या (रँचो) दृश्यासारखाच होता. डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली, कोणताही वैद्यकीय अनुभव नसतानाही, एका तरुणाने मानवी धर्म पाळत आई आणि बाळाचे जीव वाचवले.
स्थानिकांनी आणि उपस्थित प्रवाशांनी विकासच्या या कार्याचं मनापासून कौतुक केलं. “जवळ डॉक्टर नव्हते, ॲम्बुलन्स नव्हती, पण धाडस आणि माणुसकी होती आणि त्यानेच दोन जीव वाचवले,” असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. या घटनेनंतर सोशल मीडियावर विकास बेंद्रेला “खराखुरा रँचो” म्हणत कौतुकाचा वर्षाव होत आहे. खरंच, प्रसूती सुरळीत झाल्यानंतर सर्वांनी एकच गोष्ट म्हटली “ऑल इज वेल!”