ऐन दिवाळीच्या सणात कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी गावात घडलेल्या अघोरी प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. मध्यरात्री आठ ते दहा तरुणांनी गावात फिरून अघोरी पूजा केल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री काही तरुण इंगळी गावाच्या हद्दीत फिरताना सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहेत. पहाटे गावाच्या कमानीजवळ रस्त्याच्या मध्यभागी जनावराचे काळीज पांढऱ्या फडक्यात ठेवलेले आढळून आले. त्याभोवती कुंकू, गुलाल, लिंबू, केळी आणि केळीचे झाडाचे तुकडे ठेवण्यात आले होते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये अंधश्रद्धेच्या अघोरी कृतीबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.
गावातील काही नागरिक पहाटे मंदिरात जाण्याच्या मार्गावर हा प्रकार पाहून चक्रावले. ऐन दिवाळीच्या सणात अशा विचित्र कृती उघड झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीती आणि अस्वस्थता पसरली आहे. काहींनी ही कृती अघोरी तांत्रिक पूजा असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संशयित काही तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनेच्या तपासासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजचा सखोल अभ्यास सुरू असून, या प्रकारामागे नेमका उद्देश काय होता याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे शांत आणि धार्मिक वातावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या इंगळी गावात मोठी खळबळ उडाली आहे. नागरिकांनी पोलिस प्रशासनाला रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी केली आहे.






