सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत असलेल्या महिलेने शुक्रवारी (ता. 24 ऑक्टोबर) पहाटे शहरातील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी या महिला डॉक्टरच्या आत्महत्येची माहिती समोर आली आणि संपूर्ण साताऱ्यात खळबळ उडाली
धक्कादायक बाब म्हणजे महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी स्वतःच्या हातावर आत्महत्येचे कारण लिहिले होते. यामध्ये पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर अशी दोन नावे समोर आली. या घटनेची राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत तत्काळ कारवाईचे आदेश दिले. याच प्रकरणातील एक आरोपी प्रशांत बनकर याला अटक करण्यात आली आहे. शनिवारी (ता. 25 ऑक्टोबर) पहाटे 4 वाजता बनकरला पुणे येथून अटक करण्यात आली आहे.
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात दोन आरोपींची नावे समोर आली. यातील एक आरोपी पीएसआय गोपाळ बदने आहे, तर दुसरा आरोपी प्रशांत बनकर आहे. त्यामुळे या दोघांचाही पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. अशातच पोलिसांनी एका आरोपीला म्हणजेच प्रशांत बनकरला अटक केली आहे. प्रशांत बनकरने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप महिला डॉक्टरने केला आहे. तिने तिच्या हातावर लिहिलेल्या नोटमध्ये याबाबत लिहिण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांकडून बनकरचा शोघ घेण्यात येत होता. अशातच प्रशांत बनकरला आज पहाटे चार वाजता पुण्यातून अटक करण्यात आली आहे. तो मित्राच्या फार्महाऊसमध्ये लपून बसला होता, सातारा पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर ती वाऱ्याच्या वेगाने महाराष्ट्रात पसरली. त्यानंतर या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आत्महत्येपूर्वी महिला डॉक्टरने स्वतःच्या हातावर ‘माझ्या मरण्याचे कारण पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने असून, ज्याने चारवेळा माझ्यावर अत्याचार केला, तसेच प्रशांत बनकर याने चार महिने शारीरिक व मानसिक छळ केला,’ असे लिहून ठेवले आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर मानसिक व शारीरिक त्रास, तसेच लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्याला निलंबित केले असून, दोघांचा शोध घेण्यात येत होता. आता प्रशांत बनकरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.






