उच्चांक गाठलेल्या सोने-चांदीच्या दरांमध्ये गेल्या आठवड्यापासून घसरण सुरू झाली आहे. आज सोन्याचा दर ३६०० रुपयांनी, तर चांदीचा दर ५५०० रुपयांनी उतरला असून, तो आणखी कमी होण्याची ग्राहकांना अपेक्षा आहे.
सोमवारी (ता. २७) सोन्याचा प्रतितोळा दर एक लाख २५ हजार १००, तर चांदीचा प्रतिकिलोचा दर एक लाख ५३ हजार ३०० रुपये इतका होता. त्यामध्ये आज घसरण झाली. कोल्हापुरातील सराफ बाजारातील सोन्याचा दर एक लाख २१ हजार ५०० रुपये आणि चांदीचा दर एक लाख ४७ हजार ८०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
गेल्या आठवड्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारामध्येदेखील सोन्याचा दर कमी झाले आहेत. डॉलरच्या वाढत्या किमती, फेडरल बँकेचा व्याजदराबाबतचा निर्णय, अमेरिका आणि चीन यांच्यातील वाद, प्रॉफिट बुकिंग आदींचा सोन्याच्या दरांवर परिणाम होत आहे.
सोने आणि चांदीच्या दरात या आठवड्यात आणखी किमान तीन ते चार हजार रुपयांनी घट होण्याची शक्यता सराफ व्यावसायिक रणजित दुर्गुळे यांनी व्यक्त केली आहे. तुळशी विवाहानंतर लग्नसराई सुरू होणार आहे. त्यापूर्वी दर कमी होत असल्याने ग्राहकांना थोडासा दिलासा मिळत आहे.
