नाल्यामध्ये आणि बाहेरही वापरून फेकलेल्या कंडोम्सचा ढिगारा.. दिल्लीतील एका गर्ल्स हॉस्टेलमध्ये इतके कंडोम्स सापडले की पाईपलाईनच जाम झाली असा दावा करण्यात आला. गेल्या 2-3 दिवसांपासून ही बातमी, त्याचा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने पसरला आहे, सोशल मीडियावरही या बातमीने धुमाकूळ माजवला आहे. फेसबूक, इन्स्टाग्राम,ट्विटर.. जिथे बघावं तिथे ही पोस्ट व्हायरल होत आहे. ती वाचून थक्क झालेल्या लोकांनी त्यावर विविध कमेंट्सही केल्या आहेत. पण इतक्या वेगाने व्हायरल झालेल्या या व्हिडीओमागचं, बातमीमागचं, त्या दाव्यामागचं सत्य आहे तरी काय ? चला जाणून घेऊया.
अवघ्या 19 सेकंदांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरत असून बराच व्हायरल झालाय. त्यामध्ये दिसतंय की एका इमारतीच्या ग्राऊंड फ्लोअरवरील ड्रेन आणि सीवर लाइन साफसफाईसाठी उघडली गेली. तर त्याबाहेर वापरलेल्या कंडोम्सचा ढिगारा होता. एवढंच नव्हे तर त्या नाल्यातील पाण्यातही काही कंडोम्स तरंगताना दिसत होते. या व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला.
दावा काय ?
फेसबुक, इंस्टाग्राम युजर्सनी असा दावा केला आहे की, हा व्हिडिओ दिल्लीतील पीजी मुलींच्या हॉस्टेलमधील आहे. “दिल्ली पीजी गर्ल्स हॉस्टेलमध्ये कंडोममुळे पाईपलाईन ब्लॉक झाली ” या कॅप्शनसह दोन दिवसांपूर्वी एका फेसबुक पेजवर व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. मुली दिल्लीला अभ्यास करायला जातात की अजून काही… असा प्रश्न अनेकांनी यावर विचारला. इन्स्टाग्रामवरही एका यूजरने असंच काहीसं लिहीलं… “दिल्लीच्या पीजी गर्ल्स हॉस्टेलमधील पाइपलाइन ब्लॉक झाली. दृश्य तुमच्या समोर आहे, पाइपलाइनमध्ये शेकडो कंडोम सापडले… पहा धक्कादायक व्हिडिओ !” असं त्या व्हिडीओसमोर लिहीण्यात आलं होतं.
व्हिडीओमागचं सत्य काय ?
पण या व्हिडीओमागचं सत्य शोधायचा प्रयत्न केल्यावर दुसरीच माहिती समोर आली. व्हिडिओच्या मुख्य फ्रेम्सचा रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर असं आढळलं की दिल्लीतील असल्याचा दावा केलेला व्हिडिओ गेल्या 2-3 दिवसांपासून फिरत आहे. मात्र, यापूर्वी तो आफ्रिकन चॅनेलवर शेअर केला गेला होता. पडताळणी करत करता Crazy Buddies नावाचे एक फेसबूक पेज सापडलं, तिथे 17 ऑक्टोबर रोजी काही फोटो शेअर करण्यात आले होते. नायजेरियाच्या एका व्यक्तीने ते फोटो टाकले होते.
त्यासोबतच एक मोठी पोस्टही लिहीण्यात आली होती. ” घरात अनेक दिवसांपासून दुर्गंधी येत होती आणि सर्वांना अशी शंका होती की सोक पिटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. अखेर ते उघडण्यात आले आणि आतमध्ये सापडले ते वापरलेले शेकडो कंडोम्स. ते पाहून सगळेच हैराण झाले. त्यावरून असा अंदाज वर्तवण्यात आला ती एखादी व्यक्ती अशा गोष्टी फ्लश करत आहेत ज्यामुळे संपूर्ण सिस्टीम ब्लॉक होत्ये आणि त्यामुळे प्रॉब्लेम वाढतोय” अशी कॅप्शन त्या व्हिडीओसोबत लिहीली होती.
त्यानंतर इंस्टाग्रामवर EDO ऑनलाइन टीव्हीवर अपलोड केलेला एक व्हिडिओ सापडला. 13 ऑक्टोबर रोजी अपलोड केलेल्या या व्हिडिओमध्ये, एका माणूस इंग्लिशमध्ये बोलताना दिसतो. “हे नायजेरिया आहे, सर्वत्र कंडोम आहेत. पहा, सर्वत्र कंडोम आहेत.” असं तो बोलत होता. त्यावरूनच हे स्पष्टच होतं की व्हायरल झालेला हा व्हिडीओ दिल्लीचा नव्हे तर जुना आहे.
