पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत अकोल्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात तुटपुंजी रक्कम जमा करण्यात आली आहे. एकतर अतिवृष्टीने आणि परतीच्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची हाती काहीच लागलेले नाही. पीक तर गेलंच पण अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील माती सुद्धा खरडून वाहून गेली आहे. शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. त्यात केवायीसीच्या संथ प्रक्रियेने त्यांना सरकारकडून मिळणारी मदतही वेळेवर मिळाली नाही. दिवाळीत अंधारमय झाली. त्यात पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 3, 5, 8, 21 रुपये खात्यात जमा झाल्याने एकच संताप उसळला आहे. निसर्गाने सतावलेले असतानाच आता सुलतानी ताप शेतकऱ्यांना सहन करावा लागत असल्याचे समोर आले आहे.
पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत जमा झालेली नुकसानभरपाई अत्यंत तुटपुंजी असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. तर शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, शासनाला जर शेतकऱ्यांचा सन्मान करता येत नसेल, तर किमान 5 रुपये, 8 रुपये, 3 रुपये अशा स्वरूपात मदत पाठवून आमचा अपमान तरी करू नये. हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचा दावा शेतकरी करत आहे. त्यांनी पीक विमा कंपन्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह व्यक्त केले आहे. तर सरकारचा या कंपन्यांवर जरब आहे की नाही असा सवाल विचारण्यात येत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिले धनादेश
तर शेतकऱ्यांनी ही भावना व्यक्त करत शासनाचा जाहीर निषेध नोंदवला असून, पिक विमा योजनेअंतर्गत मिळालेली ही तुटपुंजी व अपमानास्पद आर्थिक मदत त्यांनी शासनाला परत करण्याचा निर्णय घेतला आणि वीस ते पंचवीस शेतकऱ्यांनी खात्यात जमा झालेली रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे धनादेश आणि रोख रक्कमेने परत करण्यात आले. शासनाने आता तरी शेतकऱ्यांची थट्टा करणे थांबवावे, अशी विनंती ही शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.
या रक्कमेत काय येतं बरं?
5 रुपये, 8 रुपये, 3 रुपयांमध्ये काय विकत घेता येते असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. पीक विम्यासाठी शेतकऱ्यांकडून रक्कम जमा करण्यात आली. पावसाने थैमान घातले. उभे पीक नासले. शेतात पाणी तुंबलेले आहे. सर्वच पीक पाण्यात सडली आहेत. अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली आहे. त्यावर पीक विमा कंपन्या कोणत्या निकषानुसार अशी मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करत आहे, असा सवाल शेतकऱ्यांनी केला. शेतकरी आदित्य मुरकुटे आणि केशव केंद्रे यांच्यासह अनेक शेतकरी आणि काँग्रेस नेते कपिल ढोके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे नुकसान भरपाईची तुटपुंजी रक्कम जमा केली.
