कडवी धरण क्षेत्रालगतच्या शेतात शेड बांधून शेळ्या पालन करणार्या ‘त्या’ वृद्ध दाम्पत्याचा अमानुष खून झाल्याची धक्कादायक माहिती कोल्हापूर पोलिसांच्या चौकशीतून पुढे येत आहे.
पोलिसांनी एका संशयित मारेकर्याला ताब्यात घेतल्याची विश्वसनीय माहिती आहे. शुक्रवारी या प्रकरणाचा उलगडा शक्य असल्याचे वरिष्ठ सूत्राकडून सांगण्यात आले.
शाहूवाडी तालुक्यातील परळे निनाईपैकी गोलिवणे वसाहत येथे रविवार, दि. 19 ऑक्टोबरला ही थरारक घटना घडली होती. बिबट्यासद़ृश प्राण्याच्या हल्ल्यात निनू यशवंत कंक (वय 75), पत्नी रखुबाई निनू कंक (69, रा. परळे निनाईपैकी गोलिवणे वसाहत) हे वृद्ध दाम्पत्य ठार झाल्याची शाहूवाडी तालुक्यासह कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात चर्चा होती. मात्र वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना या प्रकाराबाबत शंका होती. ऐन दिवाळीत घडलेल्या घटनेमुळे कंक कुटुंबीयासह तालुक्यात शोककळा पसरली होती. वृद्ध दाम्पत्याचे छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह त्याच्याच शेड परिसरात आढळून आल्याने सारा परिसर भीतीच्या छायेखाली होता.
शाहूवाडी पोलिस ठाण्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषणची यंत्रणा तपास मागावर होती. चौकशीदरम्यान तपास पथकाला महत्त्वाचे धागेदोरे लागले. पथकाने एका संशयित मारेकर्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे सखोल चौकशी करण्यात येत आहे. चौकशीत निष्पन्न होणार्या माहितीबाबत तपास अधिकार्यांनी कमालीची गोपनीयता पाळली असली तरी शुक्रवारपर्यंत या क्रूर घटनेचा उलगडा शक्य असल्याचे सांगण्यात आले.
थंड डोक्याने वृद्ध दाम्पत्याच्या खुनाचा कट
निनू कंक आणि त्यांची पत्नी रखुबाई कंक यांच्या खुनासाठी संशयित मारेकर्याने अत्यंत थंड डोक्याने कट रचल्याचा संशय आहे. खून कशासाठी आणि प्रत्यक्षात किती मारेकर्याचा सहभाग असेल, याचाही लवकरच उलगडा शक्य असल्याचे सांगण्यात आले.
