येथील जुना सांगली नाका परिसरात रस्त्याचे रुंदीकरण व सुशोभिकरणाच्या कामाची पाहणी करताना आ. राहुल आवाडे यांच्यासमोर सहायक तलाठी आनंदा डवरी हा झोकांड्या खात असल्याचे निदर्शनास आले.
सहायक तलाठी चक्क दारूच्या नशेत फुल्ल ‘टाईट’ आढळून आल्याने त्याला आ. आवाडे यांनी खडे बोल सुनावले. प्रांताधिकार्यांशी संपर्क साधून याची गांभीर्याने दखल घेत वैद्यकीय तपासणी करून त्याला तातडीने निलंबित करण्याच्या सूचनाही दिल्या. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला.
जुना सांगली नाका परिसरात भेट देऊन आ. आवाडे रस्ता रुंदीकरणाच्या अनुषंगाने अधिकार्यांना सूचना देत होते. यावेळी इचलकरंजी तलाठी कार्यालयातील सहायक तलाठी आनंदा डवरी हा मद्यधुंद अवस्थेत होता. डवरी याचे हावभाव व वर्तन पाहून आवाडे यांनी त्याच्याकडे चौकशी केली. बोलावून विचारणा करताच तो अडखळत्या आवाजात उत्तर देत असल्याचे आढळले. आवाडे यांनी तातडीने प्रांताधिकार्यांसह वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा केली. तसेच डवरीची वैद्यकीय तपासणी करून कठोर कारवाईचीही मागणी केली.




