शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी कागल येथील विशाल ऊर्फ विश्वनाथ दगडू (धोंडिराम) कांबळे (वय 34) यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी शुक्रवारी 13 महिने कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
28 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी साडेसातला हा प्रकार घडला होता. पीडित मुलीच्या आईने आरोपी विशाल ऊर्फ विश्वनाथ कांबळे याच्याविरुद्ध कागल पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी कांबळे याला अटक करून त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षाच्या वतीने अभियोक्ता अॅड. पी. जे. जाधव यांनी काम पाहिले होते. पीडित मुलगी यादिवशी सकाळी किराणा दुकानातील साहित्य घेऊन घराकडे परत येत असताना आरोपीने तिला हाताने इशारा करून जवळ बोलाविले. अज्ञानाचा फायदा घेत तिचा विनयभंग केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अग्रवाल यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. खटल्यात 7 साक्षीदार तपासण्यात आले. त्याला न्यायालयाने 13 महिने कारावास, एक हजार रुपये दंड ठोठावला आहे.




