Monday, November 3, 2025
Homeब्रेकिंगबाबा मला कार शिकवा! आग्रह मोडता आला नाही, अपघातात तीन लेकींना गमावलं;...

बाबा मला कार शिकवा! आग्रह मोडता आला नाही, अपघातात तीन लेकींना गमावलं; हृदयविकाराच्या धक्क्यानं वडिलांचं निधन

शहरानजीक असलेल्या लालगुडा गावाजवळ शुक्रवारी (ता.३१) सकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला तर एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

 

मुलीला कार शिकविण्याच्या नादामुळे झालेल्या या अपघाताने संपूर्ण शहराला हादरवून सोडले आहे.

 

मृतांमध्ये रियाजुद्दीन शेख (५३) व त्यांच्या तीन मुली मायरा (१७), झोया (१३) आणि अनिबा (११) यांचा समावेश आहे. तर त्यांच्या भावाची मुलगी इनाया शाकिर शेख (५ वर्षे) गंभीर जखमी असून, तिच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, वणीतील भीमनगर परिसरात राहणारे रियाजुद्दीन शेख यांचे लाल पुलिया भागात ट्रक दुरुस्तीचे गॅरेज आहे. शुक्रवारी (ता.३१) दुकानाला सुटी असल्याने ते घरी होते. मोठी मुलगी मायरा हिने त्यांना ‘मला कार चालवायला शिकवा’ अशी विनंती केली. त्यांनी सुरुवातीला नकार दिला. परंतु, मुलीच्या आग्रहास्तव ते तयार झाले. यानंतर तिन्ही मुलींसह रियाजुद्दीन व त्यांच्या भावाची मुलगी इनाया कारने घुग्घूस रोडने निघाले.

 

यावेळी स्कोडा कार (एमएच०१ एएच ५७००) मायरा चालवत होती. वडील बाजूला बसले होते तर तिन्ही बहिणी मागील सीटवर होत्या. मात्र, कार शिकत असलेल्या मायराचा वाहनावरील ताबा सुटला. अनियंत्रित कार काही अंतरावर दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेने समोरून येणाऱ्या ट्रकच्या (एमएच४० एके ०३५८) समोर आली.

 

अचानक पुढे आलेल्या या कारला ट्रकने जोरदार धडक दिली. ट्रकने कारला जवळपास २० फुटापर्यंत ओढत नेले. यात कारच्या चालकाच्या बाजूचा भाग पूर्णपणे चेपला. घटनेनंतर स्थानिक आणि पोलिसांनी मदतीसाठी धाव घेतली. अपघातात मायरा, झोया आणि अनिबा यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी पाच वर्षीय इनाया हिला प्रथम चंद्रपूर येथे आणि नंतर पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले. घटनेनंतर वणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह वणी रुग्णालयात पाठवले. ट्रक चालक अपघातानंतर पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा तपास सुरू आहे.

 

वडिलांना ‘हार्ट अटॅक’

 

या अपघातात रियाजुद्दीन किरकोळ जखमी झाले होते. त्यांना वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, अपघाताचा धक्का आणि सोबत असलेल्या चारही मुलींना धोका झाल्याने लक्षात आल्याने त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला. उपचारादरम्यान त्यांनीही प्राण सोडला. या घटनेमुळे वणी परिसरात शोककळा पसरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -