आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये ९ भाविकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे देखील सांगितले जात आहे.
आंध्र प्रदेशमधील हा अपघात कार्तिक महिन्यातील एकादशीच्या पवित्र प्रसंगी घडला. मंदिरात दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी जमली होती. प्राथमिक अहवालानुसार, मंदिर परिसराच्या प्रवेशद्वाराजवळ अचानक गर्दीचा दबाव वाढला, ज्यामुळे लोकांमध्ये गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. अनेकजण खाली कोसळले आणि त्यांच्या अंगावरुन अनेकांनी जाण्यास सुरुवात केली.
माहिती मिळताच प्रशासनाने मदत आणि बचाव कार्य सुरू केले. जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाने परिस्थितीवर कडक नजर ठेवली असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सकाळपासूनच मंदिरात गर्दी वाढली होती आणि पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. स्थानिक प्रशासनाने अपघाताची चौकशीचे आदेश दिले असून, गर्दी नियंत्रणात कुठे चूक झाली हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी म्हटले, “श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबुग्गा वेंकटेश्वर मंदिरातील चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेत झालेल्या जीवितहानी अत्यंत दुःखद आहे. मी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करतो. मी अधिकाऱ्यांना जखमींना शक्य तितके उत्तम उपचार देण्याचे आदेश दिले आहेत. मी स्थानिक अधिकाऱ्यांना आणि जनप्रतिनिधींना घटनास्थळी भेट देऊन मदत कार्यांचे निरीक्षण करण्यास सांगितले आहे.”




