देशातील गुन्हेगारीच्या घटना थांबायला तयार नाहीत. आता पश्चिम बंगालमधून आणखी एक सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. राजधानी कोलकात्यातील दम दम परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. नराधमांनी सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला आहे. या प्रकरणी 3 तरुणांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यातील दम दम परिसरात शनिवारी ही घटना घडली आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना म्हटले की, शनिवारी पीडित विद्यार्थिनी ट्यूशनवरून घरी परतत होती. त्यावेली एका आरोपीने तिला पार्कमध्ये नेले. त्यानंतर तिथे आणखी दोन पुरुषही आले. त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आता याप्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आलेली आहे.
बलात्कारानंतर धमकी
पोलीस अधिकाऱ्याने या घटनेबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की, मुलीला जबरदस्तीने ई-रिक्षात बसवून काही अंतरावर नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. नंतर तिन्ही आरोपींनी तिला घडलेल्या घटनेबाबत कोणालाही माहिती न देण्याबाबत धमकी दिली आणि त्यानंतर तिले जाऊ दिले. आता हे प्रकरण समोर आल्यानंतर मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
भाजपकडून कठोर कारवाईची मागणी
कोलकात्यातील या घटनेनंतर तिन्ही आरोपींविरुद्ध POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना शनिवारी रात्री दम दम परिसरातून अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज दमदम पोलिस ठाण्याबाहेर जोरदार निदर्शने केली आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता पोलीसांनी या घटनेच्या सखोल तपासाला सुरुवात केली आहे.
याआधी पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे वैद्यकीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला होता. ही विद्यार्थीनी खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. या ही तरूणी बाहेर जेवायला गेली होती त्यावेळी कॉलेज कॅम्पसजवळ सामूहिक बलात्कार झाला होता. याप्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.






