Monday, November 3, 2025
Homeक्रीडाटीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन, दक्षिण आफ्रिकेचा फायनलमध्ये 52 धावांनी धुव्वा,

टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन, दक्षिण आफ्रिकेचा फायनलमध्ये 52 धावांनी धुव्वा,

वूमन्स टीम इंडियाने अखेर अनेक दशकांची प्रतिक्षा संपवत इतिहास घडवला आहे. टीम इंडियाने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 299 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेला टीम इंडियाच्या गोलंदाजांनी 45.2 ओव्हर मध्ये 246 रन्सवर गुंडाळलं आणि 52 धावांनी विजय मिळवला. भारताने यासह वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला आहे. भारताची वर्ल्ड चॅम्पियन होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. भारतीय महिला संघाचं याआधी 2005 आणि 2017 साली विश्व विजेता होण्याचं स्वप्न भंगलं होतं. मात्र भारताने तिसऱ्या प्रयत्नात स्वत:ला सिद्ध केलं आणि वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावली.

 

भारताच्या या विजयात दीप्ती शर्मा आणि शफाली वर्मा या दोघींनी प्रमुख भूमिका बजावली. तसेच इतरांनीही योगदान दिलं. शफालीने 87 आणि दीप्तीने 58 धावा केल्या. भारताने या जोरावर दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचं आव्हान ठेवलं. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेची कॅप्टन लॉरा वोल्वार्ड्ट हीने 101 धावा केल्या. मात्र या शतकानंतरही लॉरा दक्षिण आफ्रिकेला विजयी करण्यात अपयशी ठरली. शफाली आणि दीप्ती या दोघींनी बॅटिंगनंतर बॉलिंगनेही कमाल केली. दीप्तीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर शफालीने निर्णायक क्षणी 2 विकेट्स मिळवल्या.

 

पावसामुळे सामन्याला विलंबाने सुरुवात

पावसामुळे सामन्याला दुपारी 3 ऐवजी संध्याकाळी 5 वाजता सुरुवात झाली. दक्षिण आफ्रिकेने भारताला नाणेफेक जिंकून फलंदाजीसाठी भाग पाडलं. स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा या जोडीने 104 धावांची सलामी भागीदारी केली. भारताने स्मृतीच्या रुपात पहिली विकेट गमावली. स्मृती 45 धावा केल्या. उपांत्य फेरीत भारतासाठी विजयी खेळी करणारी जेमीमाला चांगली सुरुवात मिळाली. मात्र तिला मोठी खेळी करता आली नाही. जेमीमा 24 धावांवर बाद झाली. कॅप्टन हरमनप्रीत कौर 20 रन्सवर आऊट झाली. तर शफालीने 78 बॉलमध्ये 7 फोर आणि 2 सिक्ससह 87 रन्स केल्या.

 

भारताची फलंदाजी

भारताने 4 विकेट्स गमावून 223 धावा केल्या होत्या. त्यानंतर दीप्ती शर्मा आणि ऋचा घोष या दोघींनी भारताला 298 धावांपर्यंत पोहचवण्यात प्रमुख भूमिका बजावली. दीप्तीने 58 बॉलमध्ये 3 फोर आणि 1 सिक्ससह नॉट आऊट 58 रन्स केल्या. तर ऋचा घोष हीने 24 चेंडूत 34 धावा जोडल्या. तर अमनजोत कौरने 12 धावा केल्या.भारताने अशाप्रकारे 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 298 रन्स केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी अयाबोंगा खाकाने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या.

 

दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग

दक्षिण आफ्रिकेच्या सलामी जोडीने 51 धावांची भागीदारी केली. त्यानंतर भारताने ताजमिन ब्रिट्स हीला 23 धावांवर बाद करत दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका दिला. त्यानंतर श्री चरणी हीने अँनेके बॉशला फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. बॉशला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची स्थिती 51-0 वरुन 62-2 अशी झाली. सुने लूस हीने 25 रन्स केल्या. तर अनुभवी ऑलराउंडर मारिजान काप हीला 4 धावांवर मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 4 आऊट 123 असा झाला. मात्र कॅप्टन लॉरा एक बाजू धरुन होती.

 

लॉराने या अंतिम सामन्यात खणखणीत शतक झळकावलं. मात्र लॉरा शतकानंतर फार वेळ मैदानात टिकू शकली नाही. दीप्ती शर्माने 42 व्या ओव्हरमध्ये भारताला मोठी विकेट मिळवून दिली. दीप्तीने लॉराला निर्णायक क्षणी 101 रन्सवर आऊट केलं. दीप्तीने त्यानंतर याच ओव्हरमध्ये क्लोय ट्रायोनला आऊट केलं आणि भारताला कमबॅक करुन दिलं. भारताने त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या उर्वरित 2 विकेट्स उडवल्या आणि वर्ल्ड कप आपल्या नावावर केला. टीम इंडियासाठी दीप्ती शर्मा हीने 5 विकेट्स घेतल्या. शफाली वर्माने दोघींना आऊट केलं. श्री चरणीने 1 विकेट मिळवली. तर भारताने 2 विकेट्स या रन आऊटद्वारे मिळवल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -