Wednesday, November 12, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी: वारसा नोंद करण्यासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी; शहापूरचा तलाठी, कोतवाल'ला...

इचलकरंजी: वारसा नोंद करण्यासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी; शहापूरचा तलाठी, कोतवाल’ला रंगेहात पकडले

शहापूर येथील ब्लॉक गट खुला करून वारसा नोंद करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून त्यातील दहा हजार रुपये स्वीकारताना शहापूरचा तलाठी आणि कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले.

 

तलाठी गणेश विष्णुपंत सोनवणे (वय ३२, रा. मगदूम कॉलनी, जयसिंगपूर) व कोतवाल नेताजी केशव पाटील (४५, रा. म्हसोबा रोड दर्गा गल्ली, शहापूर) अशी त्यांची नावे आहेत.

 

ही कारवाई अटलबिहारी चौक परिसरातील एका चहाच्या टपरीवर करण्यात आली. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

 

पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी दिलेली माहिती अशी, शहापूर येथील एका तक्रारदाराने वारसा नोंद करण्यासाठी शहापूर तलाठी कार्यालयात कागदपत्रे दिली होती. तेथील तलाठी गणेश सोनवणे आणि कोतवाल नेताजी पाटील यांनी गट नं. ७२९ हा ब्लॉक आहे. तो खुला करावा लागेल. त्यानंतर वारसा नोंद होईल. त्यासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी केली.

 

तडजोडीअंती सुरुवातीला १० हजार रुपये आणि काम झाल्यानंतर १५ हजार रुपये रक्कम देण्याचे ठरले. वारंवार पाठपुरावा करूनही काम होत नसल्याने तक्रारदार यांनी ३ नोव्हेंबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ऑनलाईन पोर्टलवर तक्रार नोंदविली होती.

 

त्यानुसार पथकाने दोन दिवसांपूर्वी तलाठी कार्यालयात शहानिशा केली आणि गुरुवारी सायंकाळच्या सुमारास स्टेशन रोडवरील अटलबिहारी चौक परिसरात असलेल्या एका चहाच्या टपरीवर तक्रारदाराकडून दहा हजार रुपये स्वीकारताना पथकाने रंगेहात पकडले. दोघांनाही शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणून अधिक चौकशी करीत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही कारवाई पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, सुधीर पाटील, कृष्णा पाटील, प्रकाश चौगुले यांच्या पथकाने केली.

 

हुलकावणीनंतर जाळ्यात

 

तक्रार प्राप्त झाल्यापासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक दोन दिवसांपासून चौकशी करीत होते. त्यानंतर गुरुवारी दुपारच्या सुमारास जुनी नगरपालिका परिसरात सापळा लावला होता. परंतु, तेथे त्यांनी रक्कम स्वीकारली नाही. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास स्टेशन रोडवरील चौकात लावलेल्या सापळ्यात ते अडकले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -