इचलकरंजी शहरात महसूल खात्यातील लाचखोरीचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असल्याचे गंभीर चित्र समोर येत आहे. काही वर्षांत महसूल विभागातील चार कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
तर लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या या कर्मचाऱ्यांविरुद्ध पुरावे सापडूनही ठोस कारवाई होण्यास कालावधी लागत आहे. त्यामुळे लाचेचा सिलसिला थांबण्याऐवजी तो अधिकच बळावल्याचे दिसून येते. परिणामी महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
महसूल विभाग हा थेट नागरिकांच्या दैनंदिन कामकाजाशी निगडित असलेला महत्त्वाचा विभाग आहे. शेतजमिनींचे फेरफार, वारस नोंदी, प्रमाणपत्रे, नाव फेरफार, नकाशे आदी प्रत्येक कामात नागरिकांचा महसूल कर्मचाऱ्यांशी संबंध येतो.
मात्र, या ठिकाणी काम करायचे तर काहीतरी द्यावेच लागते. अशी मानसिकता निर्माण झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सातत्याने सापळे रचून काही कर्मचाऱ्यांना पकडले असले तरी त्या प्रकरणांची चौकशी व निलंबनाची प्रक्रिया रेंगाळते. परिणामी इतर कर्मचाऱ्यांतही भीतीचे वातावरण निर्माण न होता उलट काही होणार नाही, असा विश्वास निर्माण होताना दिसून येतो.
याबाबत नागरिकांमधून रोष वाढत असून अनेकजण महसूल कार्यालयातील भ्रष्टाचाराबाबत उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. एखाद्या प्रकरणात लाच घेतल्याचे पुरावे मिळूनही महिनो महिने चौकशीच सुरू असते.
अखेर निकाल लागेपर्यंत तोच अधिकारी दुसऱ्या ठिकाणी बदली होऊन पुन्हा तेच प्रकार सुरू करतो. या प्रक्रियेमुळे प्रामाणिक अधिकारी गप्प बसतात. कठोर निर्णयाची वेळ अशा प्रकरणांत वेळीच कठोर व पारदर्शक कारवाई झाली,
तर नक्कीच महसूल विभागातील भ्रष्टाचारावर लगाम बसू शकतो. पण सध्या मात्र परिस्थिती उलट दिसते. कारवाईची गती मंदावली आहे आणि नागरिकांचा विश्वास डळमळीत होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे.


