हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे लग्न करीत नसल्याच्या कारणावरून मुलाने आईवर विळतीने जीवघेणा हल्ला केला. आईने हात मध्ये घातल्यामुळे अंगठ्याजवळील बोट तुटले. जीवावरचे बोटावर निभावल्यामुळे त्या बचावल्या.
सुरेखा दादू गेजगे (वय 45, रा. इंदिरानगर, कोरोची) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी वैभव दादू गेजगे (वय 24) याच्या विरोधात शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, त्याला अटक केली आहे.
सुरेखा या पती, तीन मुले, सून, नातवंडे यांच्या सोबत राहतात. पती दादू हे सेंट्रिंग काम करतात. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. वैभव हा अविवाहित असून, तो दारूचा व्यसनी आहे. यामुळे तो घरात नेहमी भांडणे काढत असतो. बुधवारी सर्वजण जेवण करीत असताना वैभव लग्नावरून आई सुरेखा हिच्याशी वाद घालू लागला. त्याला समजावून सांगत असतानाही तो आईस व कुटुंबीयांना शिवीगाळ करू लागला. लवकर लग्न लावून दे नाही तर तुला सोडणार नाही, अशी धमकी देऊन तो जवळच असलेली लोखंडी विळती घेऊन आईच्या अंगावर धावून आला. सुरेखा यांनी हात मध्ये घातल्यामुळे उजव्या हातावर विळतीचा जोराने वार बसल्यामुळे बोटाचे एक पेर तुटून खाली पडले. हात रक्तबंबाळ झाल्याचे पाहून वैभवने विळती तिथेच टाकून पलायन केलेे.




