बिहार निवडणुकीत मोठ्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी शेतकऱ्यांना गिफ्ट दिले आहे. 19 नोव्हेंबर रोजी पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता जमा करण्यात येणार आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan Yoajan) 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरु झाली होती. ही केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेतंर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये मदत देण्यात येते. या योजनेविषयी अशी अपडेट समोर येत आहे.
केंद्रीय कृषीमंत्र्यांनी शुक्रवारी याविषयीची माहिती दिली, त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 19 नोव्हेंबर, 2025 रोजी पीएम-किसान योजनेतंर्गत 21 वा हप्ता जमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतील. आतापर्यंत देशातील 11 कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना 20 हप्त्यांद्वारे 3.70 लाख कोटींचे वाटप करण्यात आले आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना कृषी उत्पादनं, शिक्षण अथवा आरोग्यासाठी उपयोगी पडते. विशेष म्हणजे या योजनेत सातत्याने तपासणी सुरू असते. त्यातून अपात्र आणि बोगस लाभार्थ्यांची ओळख पटवून त्यांना दूर करण्यात येते. तर लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यात येते.
चार राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात अगोदरच रक्कम जमा
अतिवृष्टी, महापूर आणि जमीन खचल्याने उत्तर भारतातील राज्यामधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. केंद्र सरकारने 26 सप्टेंबर रोजी पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 21 वा हप्ता जमा केला. या राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात 540 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट बँक खात्यात जमा केली आहे.
21 वा हप्ता जमा होण्यासाठी ही गोष्ट करा
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता पात्र शेतकर्यांना मिळेल, ज्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत नसेल त्यांना योजनेची रक्कम मिळणार नाही. योजनेचा फायदा होईल की नाही हे घर बसल्या लाभार्थ्यांना तपासता येईल. pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा. शेतकरी कॉर्नर या पर्यायावर जा. लाभार्थ्यांच्या यादीवर जा. तुमचा आधार क्रमाक, खाते क्रमांक नोंदवा. “Get Data” वर क्लिक करा. पेमेंट स्टेट्स चेक करा.



