कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्धेचा आज रेबीजने मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. रेखा सुभाषचंद्र गांधी (वय ७१, रा. रेल्वे स्टेशन, जयसिंगपूर) असे त्यांचे नाव आहे.
त्यांच्यावर २९ ऑक्टोबरला पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून जखमी केले होते. आता मृत्यूमुळे पालिका प्रशासनाविरोधात शहरात संताप व्यक्त केला जात असून, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
पिसाळलेल्या कुत्र्याने याच दिवशी आणखी पाच जणांना चावा घेतला होता. उपाययोजना म्हणून त्यांचाही प्रशासनाकडून शोध घेतला जात आहे. या कुत्र्याला हुसकवण्याच्या नादात तरुणही जखमी झाला होता. याबरोबरच रेल्वे स्टेशन परिसरात सात वर्षांच्या मुलीवरदेखील या कुत्र्याने हल्ला केला होता.
कुत्र्याने चावा घेतल्यानंतर गांधी यांनी सांगली सिव्हील रुग्णालयात रेबीजचे इंजेक्शन घेतले होते. त्यानंतर त्यांना बुधवारी (ता. १९) खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्यांच्यामध्ये रेबीजची लक्षणे आढळून आली होती. त्यांना तातडीने गुरुवारी पहाटे सांगली सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा रेबीजने मृत्यू झाल्याची माहिती त्यांचा मुलगा अॅड. नीलेश गांधी यांनी दिली.
भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर
गेल्या काही महिन्यांपासून शहरात भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कुत्र्यांकडून हल्ल्याच्या घटना दररोज घडत असताना पालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचा नागरिकांचा आरोप होता. शहरातील काही सामाजिक संघटनांनी पालिका प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला. यानंतर पालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांवर निर्बीजीकरण आणि लसीकरणाची मोहीम हाती घेतली होती.




