शेतकरी कुटुंबातील वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिश्शांची मोजणी आता अत्यंत कमी दरात म्हणजे केवळ प्रति पोटहिस्सा २०० रुपयांत होणार आहे. राज्य शासनाच्या नवीन निर्णयाची माहिती सांगली जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाला प्राप्त झाली असून, यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जिल्ह्यात आजअखेर अशा मोजणीसाठी एकही अर्ज आलेला नाही, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
यापूर्वी पोटहिश्श्याच्या मोजणीसाठी १ हजार ते १४ हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जात होते. या उच्च शुल्कामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढत होता. भूमी अभिलेखा विभागाने शुल्क संरचनेत मोठा बदल करत प्रतिहिस्सा केवळ २०० रुपये आकारण्याचा निर्णय अमलात आणला आहे. राज्यभर लागू असलेला हा निर्णय जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांच्या आदेशानुसार राबवण्यात आला आहे. तसे परिपत्रक प्रत्येक जिल्हा भूमी अभिलेख विभागाला पाठवण्यात आले आहे.
नवीन दरांची नोंद महाभू-अभिलेख संकेतस्थळावर ‘एकत्र कुटुंब पोटहिस्सा मोजणी’ या पर्यायात समाविष्ट करण्यात आली आहे. तसेच ‘ई-मोजणी व्हर्जन २.०’ या संगणक प्रणालीतही अद्ययावत बदल करण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भातील स्पष्टता वाढणार असून, पोटहिस्सा मोजणीची प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुलभ होणार आहे. कुटुंबातील जमिनीच्या वाटणी संदर्भातील वाद टाळण्यासही या निर्णयाची मोठी मदत होणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.
अनेक ठिकाणी वडिलोपार्जित जमिनीचे वाटप केवळ कागदोपत्री करून ठेवले जाते; मात्र त्यास कायदेशीर मान्यता नसल्याने भविष्यात त्यावरून वाद निर्माण होतात. हे वाद कमी करण्यासाठी शासनाने पोटहिस्सा मोजणी कमी दरात उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील मोजणी कार्यालये : ११
सांगली महापालिका कार्यालय : १
प्रत्येक तालुक्यात : १ मोजणी कार्यालय
दरमहा मिळणारे अर्ज : अंदाजे १,१००
दरमहा प्रत्यक्ष मोजणी : ७५० ते ८५०



