उजळाईवाडी विमानतळ रोडनजीक क्रिकेट खेळत असताना टेरेसवर गेलेला बॉल काढण्यासाठी गेलेल्या 13 वर्षीय विद्यार्थ्याचा विद्युत वाहिनीचा शॉक लागून मृत्यू झाला. मोहम्मद अफ्फान मोहम्मद आसिफ बागवान असे त्याचे नाव आहे.
ही दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हनुमंत खांडेकर यांच्या घराच्या टेरेसवर घडली.
टीईटीसंदर्भात शुक्रवारी शिक्षकांचे शाळा
बंद आंदोलन असल्यामुळे विद्यार्थ्यांना अघोषित सुट्टी मिळाली होती. कोल्हापुरातील वि. स. खांडेकर प्रशालेत सातवीत शिकत असलेला मोहम्मद सकाळी आई-वडील, बहिणीसोबत नाश्ता करून मित्रांसह क्रिकेट खेळायला विमानतळ रोड लागूनच असलेल्या हनुमंत खांडेकर यांच्या घरासमोर गेला. मोकळ्या जागेत क्रिकेट खेळत असताना मारलेला बॉल खांडेकर यांच्या बंगल्याच्या टेरेसवर गेला. तो काढण्यासाठी मोहम्मद घराच्या वरतीवर चढला. बॉल घेऊन परत येत असताना बंगल्यावरून गेलेल्या अकराशे केवी हाय व्होल्टेज तारेचा स्पर्श त्याच्या गळ्याला झाला. जोराचा शॉक लागल्याने तो खाली कोसळला. मोठा आवाज झाल्याने नागरिक घटनास्थळी धावले. त्यांनी गंभीर जखमी मोहमदला बेशुद्धावस्थेत रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केले. पण त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गोकुळ शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेंडा पार्क येथे पाठवला. श्वविच्छेदनानंतर नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.
शाळा सुरू असती तर…
मोहम्मद याचे वडील खासगी कंपनीत कामाला आहेत. त्याच्या पश्चात वडील, आई आणि दोन बहिणी आहेत. कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. आज शाळा सुरू असती तर कदाचित ही दुर्घटना घडली नसती, अशी हळहळ यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.






