“तुमची ऑर्डर आली आहे…” हे वाक्य रोज हजारो डिलिव्हरी बॉईज म्हणतात. पण तामिळनाडूमध्ये एका ब्लिंकिट रायडरने फक्त ऑर्डर पोहोचवली नाही, तर मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या एका महिलेला जीवदान दिलं.
रात्रीच्या अंधारात उंदराच्या विषारी औषधाची ऑर्डर घेऊन गेलेल्या या तरुणाने आपल्या सतर्कतेने माणुसकीचं एक असं उदाहरण मांडलंय, ज्याची चर्चा आता देशभर होत आहे. या तरुणाचं सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून त्याचं कौतुक होतं आहे.
संशय आला अन् काळजात धस्स झालं!
त्या रात्री ब्लिंकिटवर डिलिव्हरी बॉय एक ऑर्डर मिळाली. ऑर्डर होती उंदराच्या विषारी औषधाची तीन पाकीटं. वेळ रात्रीची होती, त्यामुळे रायडरच्या मनात पहिली शंका आली की, उंदरा मारण्यासाठी इतक्या रात्री या औषधाची गरज काय? तो दिलेल्या पत्त्यावर पोहोचला आणि त्याने बेल वाजवली. समोरून जेव्हा एका महिलेने दार उघडलं, तेव्हा तिचे डोळे रडून सुजलेले आणि थरथरणारे हात पाहून रायडरला खात्री पटली की काहीतरी भयंकर घडणार आहे.
” खोटं बोलू नका…”
इन्स्टाग्रामवर आपला अनुभव शेअर करताना तो रायडर म्हणाला, “तिला रडताना पाहून मी हादरलो. मी तिला थेट विचारलं, ”ताई, तुम्हाला काही त्रास आहे का? तुम्ही आत्महत्या करण्यासाठी तर हे मागवलं नाही ना?” तिने आधी नकार दिला, पण तिची अवस्था सगळं काही सांगून जात होती. मी तिला म्हणालो, ”खोटं बोलू नका. जर उंदरांचा त्रास असता तर तुम्ही सकाळीही हे मागवू शकला असता, रात्रीच्या वेळी याची काय गरज? परिस्थिती कितीही कठीण असली तरी टोकाचं पाऊल उचलू नका, आयुष्य खूप मौल्यवान आहे.”
माणुसकी जिंकली, विष परत नेलं!
रायडर तिथेच थांबला नाही. त्याने त्या महिलेचं समुपदेशन केलं, तिला धीर दिला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिची ऑर्डर कॅन्सल केली. तो विषाची पाकीटं आपल्यासोबत परत घेऊन गेला. “आज मला वाटतंय की मी आयुष्यात काहीतरी कमावलं आहे,” अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी या रायडरवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिलं, “जर तिथे रोबोट किंवा ड्रोन असता तर त्याने फक्त डिलिव्हरी केली असती, पण एका माणसाने तिथे माणुसकी दाखवली.” दुसऱ्याने म्हटलं, “रेटिंग्सच्या मागे धावणाऱ्या जगात या तरुणाने जबाबदारी निवडली, यालाच खरी सामाजिक जाणीव म्हणतात.” आजच्या काळात जिथे लोक शेजाऱ्याकडे लक्ष देत नाहीत, तिथे एका अनोळखी डिलिव्हरी बॉयने दाखवलेली ही तत्परता खरोखरच कौतुकास्पद आहे. ब्लिंकिट कंपनीने अशा ‘रिअल लाईफ हिरो’चा सन्मान करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.



