दहा वर्षीय विद्यार्थिनीच्या असहायतेचा फायदा घेत लैंगिक अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी देणार्या भादोले (ता. हातकणंगले) येथील राजाराम अशोक सुतार ऊर्फ सुतार महाराज (वय 52) यास 20 वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंड सोमवारी (दि.12) सुनावण्यात आला. दि. 17 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी पीडितेच्या घरात माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार घडला होता.
जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्र. 3) एस. एस. तांबे यांनी आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली. सरकार पक्षामार्फत सहायक सरकारी वकील अमृता पाटोळे यांनी काम पाहिले. भादोले येथील दहा वर्षीय विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार खटल्याच्या निकालाकडे इचलकरंजी, वडगाव, हातकणंगलेसह जयसिंगपूर, शिरोळ परिसराचे लक्ष लागले होते. नराधम सुतार हा भादोले परिसरात महाराज म्हणून ओळखला जात होता. परिसरात धार्मिक सत्संगाच्या कार्यक्रमांचेही तो आयोजन करत पीडित मुलीला रविवारी सुट्टीच्या दिवशी सत्संगाची गाणी शिकवत असे. दि. 17 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 9.30 वाजता नराधम पीडितेच्या घरी गेला. या दिवशी घरात कोणीही नसल्याची संधी त्याने साधली. पीडितेला चॉकलेट देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
झालेल्या घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याचीही धमकी नराधमाने मुलीला दिली. त्यामुळे भेदरलेल्या पीडितेने नराधमाकडे गाणे शिकण्यासाठी जायचे बंद केले होते. पीडिता घरातील लोकांशीही बोलत नव्हती. नराधम पुन:पुन्हा मुलीच्या घरी येत सत्संगची गाणी शिकण्यासाठी मुलीकडे आग्रह धरू लागला; पण मुलीने स्पष्ट नकार दिला. मुलीच्या स्वभावामध्ये अचानक फरक पडल्याने कुटुंबीयांनी तिला धीर देऊन चौकशी केली असता अत्याचाराचा भांडाफोड झाला.
पीडितेच्या आईने वडगाव पोलिस ठाण्यात धाव घेत भामट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सहायक सरकारी वकील अमृता पाटोळे यांनी खटल्यात 7 साक्षीदार तपासले. सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद, वरिष्ठ न्यायालयातील न्यायनिवाडे, प्रत्यक्ष दाखल पुरावे ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश (3) एस. एस. तांबे यांनी आरोपी राजाराम सुतार याला दोषी ठरविले. 20 वर्षे सक्तमजुरी, एक हजार रुपये दंड ठोठावला. दंड न दिल्यास 3 महिने साधी कैद, अशी शिक्षा ठोठावली.





