कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची (Kolhapur Municipal Election Results) मतमोजणी आज, शुक्रवारी (ता. १६) पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर मतमोजणीदरम्यान तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे (Collector Amol Yedage) यांनी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
या आदेशांनुसार विजयी मिरवणुका काढणे, तसेच फटाके फोडण्यास पूर्णतः मनाई करण्यात आली आहे.
निवडणूक प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये आणि संभाव्य तणाव अथवा दोन गटांतील संघर्ष टाळण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये हे आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या बाबींवर असेल संपूर्ण बंदी :
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार खालील प्रकारच्या कृतींना पूर्णतः मज्जाव करण्यात आला आहे.
विजयी मिरवणुका – निवडणुकीत यश मिळालेल्या उमेदवारांना कोणत्याही स्वरूपाची मिरवणूक काढता येणार नाही.
रॅली काढण्यास मनाई – राजकीय पक्षांचे कार्यकर्ते किंवा कोणत्याही व्यक्तीस शहर किंवा गावातून रॅली काढण्यास बंदी आहे.
डीजे व डॉल्बीवर बंदी – सार्वजनिक ठिकाणी डीजे, डॉल्बी किंवा मोठ्या आवाजाची ध्वनिवर्धक यंत्रणा वापरण्यास मनाई आहे.
सायलेन्सर काढलेल्या दुचाकींवर कारवाई – सायलेन्सर काढून मोठा आवाज करत वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
गुलाल उधळण्यास बंदी – सार्वजनिक ठिकाणी गुलालाची उधळण किंवा वापर करण्यास मनाई आहे.
फटाके फोडण्यास मनाई – निकालानंतर जल्लोषाच्या नावाखाली फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला विशेष बंदोबस्ताचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षकांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे संभाव्य सार्वजनिक उपद्रव टाळण्यासाठी हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. नागरिकांनी तसेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.






