तुम्ही फोनमध्ये काही बोलत असाल, तर काही वेळानंतर संबंधित प्रोडक्टची जाहिराती फोनमध्ये दिसते. याचा अनुभव अनेकांना येतो, तुम्हालाही आला असेल. यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, गूगल आपल्या नकळत आपली संभाषणे रेकॉर्ड करतो का?
या प्रश्नाचे उत्तर थेट ‘हो’ किंवा ‘नाही’ असे नसले, तरी यामागे एक महत्त्वाचे फिचर Google Voice Activity आहे.
Google Voice Activity म्हणजे काय?
Google Voice Activity हे गूगल अकाउंटशी संबंधित फिचर आहे. जेव्हा तुम्ही “Ok Google” किंवा “Hey Google” असे म्हणता आणि आवाजाद्वारे (Voice Search) प्रश्न विचारता, तेव्हा त्या व्हॉइस कमांड्स आणि ऑडिओ क्लिप्स तुमच्या अकाउंटमध्ये सेव्ह केल्या जाऊ शकतात. यामागचा उद्देश गूगल असिस्टंट अधिक अचूक बनवणे आणि युजर्सना चांगले परिणाम देणे हा आहे.
गूगल नकळत आवाज रेकॉर्ड करतो का?
गूगलच्या म्हणण्यानुसार, युजरने स्वतः वॉयस कमांड दिली किंवा अॅपला मायक्रोफोनची परवानगी दिली, अशाच वेळी आवाज रेकॉर्ड होतो. मात्र काही वेळा फोन चुकून अॅक्टिव्ह झाल्यास थोड्या ऑडिओ क्लिप्स सेव्ह होऊ शकतात. यामुळेच “गूगल सतत ऐकत आहे” असा गैरसमज पसरतो.
आपल्या व्हॉइस रेकॉर्डिंग्स कशा पाहायच्या?
तुमच्या गूगल अकाउंटमध्ये कोणकोणत्या व्हॉइस अॅक्टिव्हिटी सेव्ह झाल्या आहेत, हे पाहणे अगदी सोपे आहे.
Google Account मध्ये लॉगिन करा
My Activity / Activity Controls सेक्शन उघडा
Voice & Audio Activity या पर्यायावर जा
येथे तारीख, वेळेसह ऑडिओ रेकॉर्डिंग्स दिसतील. तुम्ही त्या ऐकूही शकता.
Voice Activity कशी डिलीट करायची?
जर तुम्हाला या रेकॉर्डिंग्स नको असतील तर एक-एक करत डिलीट करू शकता किंवा संपूर्ण Voice Activity एकाच वेळी क्लिअर करू शकता. तसेच सेटिंग्समध्ये जाऊन Voice & Audio Activity पूर्णपणे बंद करण्याचाही पर्याय उपलब्ध आहे.
प्रायव्हसी वाढवण्यासाठी काय करावे?
नियमितपणे Google Account Activity तपासा
मायक्रोफोनची परवानगी फक्त गरजेच्या अॅप्सनाच द्या
“Hey Google” फिचर वापरत नसाल तर ते बंद ठेवा






