पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला बळकटी देत संरक्षण संपादन परिषदेने २.३८ लाख कोटी रुपयांच्या विशाल संरक्षण प्रस्तावांना मंजुरी दिली आहे.
या निर्णयामुळे देशाच्या सीमांची सुरक्षा तर अभेद्य होईलच, शिवाय शेअर बाजारातील डिफेन्स सेक्टरच्या शेअर्समध्येही ‘रॉकेट’ तेजी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांवर भर दिल्याने भारतीय कंपन्यांना हजारो कोटींच्या ऑर्डर्स मिळणार आहेत.
‘भारत इलेक्ट्रॉनिक्स’ ठरणार सर्वात मोठा खेळाडू
दिग्गज ब्रोकरेज फर्म ‘मोतीलाल ओसवाल’च्या अहवालानुसार, या संपूर्ण सौद्यात भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आघाडीवर आहे. भारतीय नौसेनेच्या युद्धनौका कार्यक्रमातून कंपनीला १२,००० ते १५,००० कोटी रुपयांचे काम मिळण्याची शक्यता आहे. क्यूआरएसएएम मिसाईल सिस्टिमच्या आगामी ऑर्डर्समुळे कंपनीची ‘ऑर्डर बुक’ अधिक मजबूत होईल. ब्रोकरेजने या शेअरला ५२० रुपयांचे उद्दिष्ट दिले असून, सध्याच्या भावापेक्षा हा शेअर २८% वाढू शकतो.
HAL आणि BDL कडून तगड्या परताव्याची अपेक्षा
आकाशात भारताची ताकद वाढवणाऱ्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडबद्दल बाजार विश्लेषक अत्यंत उत्साही आहेत. मोतीलाल ओसवाल यांनी एचएएलच्या शेअरसाठी ५,५०० रुपयांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे, जे सध्याच्या किमतीपेक्षा ५४% जास्त आहे.
क्षेपणास्त्र निर्मिती करणाऱ्या भारत डायनॅमिक्स या कंपनीला संरक्षण प्रस्तावांचा मोठा फायदा होणार आहे. या शेअरमध्ये ६१ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज असून, १,८०० रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे.
इतर ‘डिफेंस’ शेअर्सवरही नजर
डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात कार्यरत असलेल्या इतर कंपन्यांमध्येही गुंतवणूकदारांना संधी आहे.
अस्त्रा मायक्रोवेव्ह : या शेअरसाठी १,१५० रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, यात ३०% वाढीची अपेक्षा आहे.
झेन टेक्नॉलॉजीज : ड्रोन आणि सिम्युलेटर बनवणाऱ्या या कंपनीला ‘न्यूट्रल’ रेटिंग देण्यात आले असून, याचे टार्गेट १,४०० रुपये ठेवण्यात आले आहे.
स्वदेशी तंत्रज्ञानावर भर
जरी काही गुंतागुंतीच्या तंत्रज्ञानासाठी आपण अद्याप परदेशावर अवलंबून असलो, तरी सरकारची प्राथमिकता ही भारतीय कंपन्यांना ऑर्डर देऊन देशातच रोजगार आणि स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याची आहे. यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी डिफेन्स शेअर्स हे ‘मल्टीबॅगर’ ठरू शकतात.



