Friday, May 1, 2026
Homeकोल्हापूर'महिला अनाथ आश्रम कोल्हापूर' नावाखाली लूट; आश्रमाद्वारेच लग्न करून देण्याचे उपवरांना आमिष,...

‘महिला अनाथ आश्रम कोल्हापूर’ नावाखाली लूट; आश्रमाद्वारेच लग्न करून देण्याचे उपवरांना आमिष, पैसे भरून घेताच भामटे होतात ‘नॉट रिचेबल’

‘वयाची व जातीची अट नाही. मुलगा व्यावसायिक किंवा शेती करणारा, काम करून खाणारा चालेल. निर्व्यसनी सर्वसाधारण असावा….,’ अशा अपेक्षा लिहून एक पोस्ट व्हायरल केली जाते. लग्नाच्या प्रतीक्षेतील प्रत्येकालाच या अटी अत्यंत साध्या-सोप्या वाटतात.

 

एका पाठोपाठ मुले या पोस्टमधील मोबाईलवर संपर्क करतात. ‘महिला अनाथ आश्रम, कोल्हापूर’ अशा नावाने राज्यभरातील मुलांची फसवणूक सुरू आहे. कोल्हापूरची बदनामी करणारा प्रकार तातडीने रोखण्यासाठी ठोस पावले (Kolhapur orphanage marriage fraud case) उचलण्याची गरज आहे.

 

पालकांमधील मुलांच्या लग्नाची चिंता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. एकीकडे मुलींची घटणारी संख्या, तर दुसऱ्या बाजूला नोकऱ्यांअभावी मुलांची होणारी फरपट. मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढत असून, अनेक मुले शिक्षण सोडून मिळेल ती कामे करताना दिसत आहेत. लग्नाचे वय उलटण्याच्या भीतीने अनेक जण सोशल मीडियावरील जाहिरातींवर विश्वास ठेवून अनोळखींकडे माहिती पाठवतात. याचाच गैरफायदा घेऊन कोल्हापूरच्या नावाने उपवरांची फसवणूक सध्या सुरू आहे.

 

कोल्हापूरची नाहक बदनामी

 

फेसबुकवर ‘९६ कुळी मराठा वधूवर’ नावाचे पेज चालविले जात आहे. ज्यावर ‘महिला अनाथ आश्रम कोल्हापूर’ नावाच्या संस्थेमध्ये २० ते ४० वयोगटातील उपवरांना लग्नासाठी मुली असल्याचे सांगितले जाते. या जाहिरातीत दिलेल्या क्रमांकावर फोन करून संपर्क साधण्याचेही आवाहन केले जाते. याआधारे मुलांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत पैसे उकळण्याचे काम सुरू आहे.

 

कडक नियमावलीद्वारे भीती

 

लग्नासाठीच्या मुली अनाथ आश्रमात असल्याने कोणीही परस्पर भेटू शकणार नाही. त्यांचे फोटो पाठविले जाणार नाहीत. नोंदणी केल्यानंतर संबंधित मॅडम ज्या सूचना देतील, त्याचे पालन करावे लागेल, अशी नियमावली पाठवून भीती घातली जाते.

 

कोल्हापुरात पोहोचताच धक्का

 

कोल्हापुरात अनाथ आश्रमात लग्न लावून देण्याच्या नावाखाली मुलांना बोलावले जाते. महाडहून असेच एक कुटुंब सर्व तयारीनिशी कोल्हापुरात पोहोचले; पण यानंतर पैसे स्वीकारणाऱ्या महिलेशी कोणताही संपर्क झाला नाही. यामुळे त्यांनी स्थानिकांकडून माहिती घेत मंगळवारपेठेतील बालकल्याण संकुलाला भेट दिली; परंतु याठिकाणी अशाप्रकारे कोणतीही जाहिरात किंवा महिलेकडून असा प्रकार झाला नसल्याचे त्यांना समजले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्या कुटुंबाला धक्का बसला.

 

आमच्याकडून कोणत्याही प्रकारची जाहिरात केली जात नाही. आपण ज्या अनाथ मुलींचे विवाह करून देणार असतो, त्याची प्रक्रिया शासकीय नियमाने होते. जे लोक संपर्क साधतात त्यांचे बायोडाटा स्वीकारून मुलींना याबाबत कल्पना दिली जाते. त्यांच्याकडून पसंती असेल तरच पुढील कार्यवाही होते. गेल्या काही दिवसांत अनाथ आश्रमाच्या नावाखाली फसवणूक वाढली असून, असे लोक आम्हाला भेटतात. अशावेळी आम्ही त्यांना पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला देतो. अनाथ मुलींशी विवाह करण्याच्या नावाखाली कोणाकडेही पैसे भरून फसू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -