भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला नवा टायटल स्पॉन्सर मिळाला असून ‘मुथूट फिनकॉर्प’ने (Muthoot Fincorp) मार्च २०२८ पर्यंत भारतात होणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट सामन्यांचे टायटल स्पॉन्सरशिप अधिकार मिळवले आहेत, याबद्दलची माहिती क्रिकबझने दिली आहे.
या नव्या करारांतर्गत या स्पॉन्सरशिपला ‘ब्लू मुथूट’ असे संबोधले जाणार आहे. याआधी ‘आयडीएफसी फर्स्ट बँक’कडे हे स्पॉन्सरशिपचे अधिकार होते, ज्यांचा करार नुकताच संपुष्टात आला आहे.
या कराराअंतर्गत मुथूट फिनकॉर्प बीसीसीआयला प्रति सामना ४.८५ कोटी रुपये देणार असल्याचे समोर आले आहे. अधिकृत घोषणा अद्याप बाकी असली, तरी या मोठ्या रकमेमुळे बीसीसीआयला मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
हा नवा करार तत्काळ लागू होणार असून २७ सप्टेंबरपासून तिरुअनंतपुरम येथे सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वनडे मालिकेपासून टीम इंडिया नव्या स्पॉन्सरसह मैदानात उतरेल. विशेष म्हणजे या मालिकेतील पहिला सामना मुथूट फिनकॉर्पचे मूळ राज्य असलेल्या केरळमध्येच खेळवला जाणार आहे.
सुरुवातीला बीसीसीआयने स्पॉन्सरशिपसाठी निविदा प्रक्रिया राबवली होती, मात्र बेस प्राईस जास्त असल्यामुळे एकाही कंपनीने बोली लावली नाही. त्यानंतर बीसीसीआयने गुगल जेमिनी आणि एसबीआय लाईफ यांसारख्या कंपन्यांशी थेट चर्चा केली आणि अखेर मुथूट फिनकॉर्पसोबत हा करार निश्चित केला.
