Homeमहाराष्ट्रराज्यासह केंद्रात राजकीय उलथापालथ होईल, देशात आंदोलने होतील; पट्टणकोडोली फरांडे बाबांची भाकणूक...

राज्यासह केंद्रात राजकीय उलथापालथ होईल, देशात आंदोलने होतील; पट्टणकोडोली फरांडे बाबांची भाकणूक उत्साहात संपन्न

भंडाऱ्याची मुक्त उधळण, ढोल-कैताळांचा निनाद आणि ‘विठ्ठल-बिरदेवाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने पट्टणकोडोली आज भक्तिरंगात न्हाऊन निघाली. लाखो भाविकांच्या उपस्थितीत फरांडेबाबांच्या हेडाम नृत्याने श्री विठ्ठल-बिरदेव यात्रेच्या मुख्य सोहळ्याला प्रारंभ झाला.

 

त्यानंतर मंदिरात झालेल्या भाकणुकीकडे भाविकांचे लक्ष लागले होते. यंदा प्रथमच हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आल्याने यात्रेच्या उत्साहात भर पडली.

 

सकाळी परंपरेनुसार यात्रेच्या धार्मिक विधींना सुरुवात झाली. गावचावडीवर मानाच्या दुधारी तलवारींचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मिरवणुकीने भानस मंदिर आणि श्री विठ्ठल-बिरदेव मंदिरात पूजन करून तलवारी फरांडेबाबांकडे नेण्यात आल्या. प्रकाश पाटील, रणजित पाटील, नंदकुमार जोशी, अभय मगदूम, गावडे, कुलकर्णी, चौगुले यांच्यासह बाराबलुतेदार, मानकरी आणि धनगर समाजातील पंच व ग्रामस्थांनी फरांडेबाबांची भेट घेऊन त्यांना मंदिरात येण्याचे निमंत्रण दिले.

 

निमंत्रण स्वीकारून फरांडेबाबा मानाच्या दगडी गादीवरून उठले. दुपारी दीडच्या सुमारास त्यांच्या हेडाम नृत्याला सुरुवात झाली. या वेळी भाविकांनी भंडारा, खारीक, खोबरे आणि लोकर यांची मुक्तहस्ते उधळण केली. त्यामुळे परिसर पिवळ्याधमक भंडाऱ्याने उजळून निघाला. ‘विठ्ठल-बिरदेवाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

 

हेडाम नृत्यानंतर फरांडेबाबांनी मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी देववाणी अर्थात भाकणूक कथन केली. पाऊस, शेती, धान्याचे भाव, राजकारण, देश-विदेशातील घडामोडी आणि विज्ञान संशोधन यांसह विविध विषयांवरील भाकणूक ऐकण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

 

दरम्यान, श्री विठ्ठल-बिरदेवाची पूजा बांधण्यात आली. आमदार अशोकराव माने यांनी देवाचे दर्शन घेतले. यावेळी राजू हुपरे, रानोजी पुजारी, सुहास राजमाने, तिळवनीचे सरपंच राजेश पाटील, बाळासाहेब खोंद्रे आदी उपस्थित होते. यात्रेचा मुख्य सोहळा पार पडला असला, तरी पुढील दोन दिवस धार्मिक विधी सुरू राहणार आहेत.

 

पहिल्यांदाच हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

 

पट्टणकोडोलीच्या विठ्ठल-बिरदेव यात्रेत यंदा प्रथमच हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. फरांडेबाबांची भाकणूक झाल्यानंतर हेलिकॉप्टरमधून श्री विठ्ठल-बिरदेव मंदिरावर फुलांची उधळण करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळाल्याने हा उपक्रम राबविण्यात आला. हेलिकॉप्टरमधून झालेली पुष्पवृष्टी यात्रेचे विशेष आकर्षण ठरली.

 

फरांडेबाबांची भाकणूक

 

पर्जन्य : सात दिवसांत पाऊस पडेल.

 

धान्य : धान्याचे दर परिस्थितीनुसार बदलतील.

 

महागाई : मिरची, साखर आणि कडधान्ये महागतील.

 

राजकारण : अनेक ठिकाणी राजकीय गोंधळ निर्माण होईल.

 

सोन्या-चांदीचे दर : सोन्या-चांदीच्या दरांत मोठी चढ-उतार होईल.

 

पुढील पेरणी : रोहिणीचा पाऊस आणि मृग नक्षत्रातील पेरणी सर्वत्र होईल.

 

भक्ती : सर्वत्र भक्तिमय वातावरण राहील.

 

विज्ञान संशोधन : जगात अनेक ठिकाणी नवे संशोधन होईल; मात्र त्यातून मानवी जीवनाला त्रास होण्याची शक्यता आहे.

 

देश-विदेश : विविध देशांत आंदोलने, राजकीय उलथापालथ आणि मोठ्या लढाया होतील.

 

लोकसंख्या : जगाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढेल आणि महिलांचे वर्चस्व वाढेल.

 

रोगराई : देवाची सेवा करणाऱ्यांची रोगराई दूर होईल.

 

गुरुसेवा : गुरूंची सेवा करणाऱ्यांवर कृपा राहील, असा संदेश भाकणुकीतून देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -