Homeमहाराष्ट्रपुढील 24 तासांत महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

पुढील 24 तासांत महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

महाराष्ट्रात पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यासर जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभााकडून 10 जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला असून अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसणार आहे.

 

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा इशारा आहे. काही भागांत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.

 

कोकण विभागात पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलक्या पावसाच्या सरी अपेक्षित आहेत. 29 ऑक्टोबर रोजी काही भागांत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता असून वाऱ्यांचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो.

 

पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि पुणे घाटमाथा परिसरात प्रामुख्याने कोरडे, तर काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे. कोल्हापूर जिल्ह्याला यलो अलर्ट असून ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतही हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

विदर्भात अकोला आणि अमरावती जिल्ह्यांत कोणताही अलर्ट नसला, तरी भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. या भागांत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

 

दरम्यान, ऑक्टोबर हिटचा सामना करणाऱ्या राज्यात आता पुन्हा पावसाचे वातावरण निर्माण होत आहे. पुढील दोन दिवस अनेक भागांत पावसाची शक्यता असून त्यानंतर हवामानात पुन्हा बदल होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना हवामानाच्या सूचनांकडे लक्ष द्यावे आणि वादळी वाऱ्यांच्या वेळी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -