दसऱ्यानंतर ज्या सणाची आतुरतेने प्रतीक्षा असते, तो म्हणजे दिवाळीचा सण.. हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण म्हणजे दिवाळी.. दिव्यांचा प्रकाश, रांगोळ्यांची सजावट, फराळाचा सुगंध आणि लक्ष्मीपूजनाचा मंगलमय उत्सव यामुळे दिवाळीला विशेष महत्त्व आहे. यंदा 2026 मध्ये दिवाळी उत्सवाला 5 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून 11 नोव्हेंबरला भाऊबीजेने या उत्सवाची सांगता होणार आहे.
यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी (Diwali 2026 Muhurta)
वैदिक पंचांगानुसार, यंदा विशेष म्हणजे 8 नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी येत आहेत. त्यामुळे दिवाळीच्या तिथी आणि पूजामुहूर्ताबाबत भाविकांमध्ये उत्सुकता आहे. जाणून घेऊया वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेच्या तारखा आणि शुभ मुहूर्त.
दिवाळी 2026 : सर्व शुभ तिथी आणि मुहूर्त
वसुबारस – गुरुवार, 5 नोव्हेंबर 2026
दिवाळी उत्सवाची सुरुवात वसुबारस या सणाने होते. या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते. कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि संततीच्या कल्याणासाठी प्रार्थना केली जाते.
पूजा मुहूर्त : सायंकाळी 5:36 ते रात्री 8:11.
धनत्रयोदशी – शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026
धनत्रयोदशीला धनतेरस असेही म्हणतात. या दिवशी भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी आणि कुबेराची पूजा केली जाते. सोने, चांदी, भांडी किंवा नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो.
शुभ मुहूर्त
सकाळी 8 ते 11 – लाभ अमृत योग
दुपारी 12:30 ते 2 – शुभ योग
रात्री 9:30 ते 11 – लाभ योग
लक्ष्मी-कुबेर पूजन : सायंकाळी 6:32 ते 8:31.
नरक चतुर्दशी – रविवार, 8 नोव्हेंबर 2026
नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. पहाटे सुगंधी तेल आणि उटणे लावून स्नान केले जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केल्याची धार्मिक मान्यता आहे.
अभ्यंगस्नान मुहूर्त : पहाटे 5:34 ते 6:33.
यमदीपदान मुहूर्त : सायंकाळी 5:45 ते रात्री 7:20.
लक्ष्मीपूजन – रविवार, 8 नोव्हेंबर 2026
दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी माता लक्ष्मी, भगवान गणेश आणि देवी सरस्वती यांची पूजा केली जाते. घरात सुख, समृद्धी, धनधान्य आणि भरभराट नांदावी, यासाठी लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी घराच्या प्रवेशद्वारावर दिवे लावणे, रांगोळी काढणे आणि लक्ष्मीचे स्वागत करणे याला विशेष महत्त्व आहे.
लक्ष्मीपूजन मुहूर्त : सायंकाळी 6:26 ते रात्री 8:26.
शुभ अमृत योग : सायंकाळी 6:30 ते रात्री 9:30.
दिवाळी पाडवा – मंगळवार, 10 नोव्हेंबर 2026
दिवाळी पाडव्याला बलिप्रतिपदा असेही म्हणतात. या दिवशी राजा बळी आणि भगवान विष्णूच्या वामन अवताराचे स्मरण केले जाते. महाराष्ट्रात पाडव्याला पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम आणि विश्वासाचा सण म्हणूनही महत्त्व आहे.
शुभ मुहूर्त
सकाळी 9:25 ते दुपारी 1:32
सकाळी 11 ते दुपारी 2 – लाभ अमृत योग
दुपारी 3:30 ते सायंकाळी 5 – शुभ योग
भाऊबीज – बुधवार, 11 नोव्हेंबर 2026
दिवाळी उत्सवाची सांगता भाऊबीजेने होते. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. भाऊ बहिणीला प्रेमाची भेट देतो. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो.
ओवाळणी मुहूर्त : दुपारी 1:30 ते 3:45.
