Homeमहाराष्ट्रमहागाईचा भडका उडाला! कांदा 116% तर लसूण 60% महागला; महागाईच्या डबल अटॅकने...

महागाईचा भडका उडाला! कांदा 116% तर लसूण 60% महागला; महागाईच्या डबल अटॅकने अक्षरशः रडवले, होम लोनचा EMI वाढण्याची भीती

सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका बसला आहे. खाद्यपदार्थांच्या, विशेषतः भाज्यांच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाई दर वाढून 6.09 टक्क्यांवर पोहोचला आहे.

 

हा आकडा रिझर्व्ह बँकेने (RBI) निश्चित केलेल्या 6 टक्क्यांच्या कमाल मर्यादेपेक्षाही अधिक आहे. महागाईच्या या झटक्यामुळे आता गृहकर्ज आणि वाहन कर्जाचे EMI स्वस्त होण्याच्या आशा तूर्तास संपुष्टात येताना दिसत आहेत.

 

ऑक्टोबरमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर (CPI) आधारित किरकोळ महागाई दर 6.09 टक्के नोंदवला गेला. यापूर्वी सप्टेंबरमध्ये हा दर 5.54 टक्के होता. महागाईच्या आलेखात सलग नवव्या महिन्यात वाढ नोंदवण्यात आली आहे. जानेवारी 2026 मध्ये हा दर केवळ 2.74 टक्के होता. सर्वाधिक वाढ अन्नधान्य आणि खाद्यपदार्थांच्या महागाईत झाली आहे. सप्टेंबरमधील 7.74 टक्क्यांवरून हा दर ऑक्टोबरमध्ये वाढून 8.94 टक्क्यांवर पोहोचला आहे.

 

लसूण-कांद्याने वाढवली महागाईची झळ

 

खाद्यपदार्थांच्या महागाईत प्रामुख्याने कांदा आणि लसूण यांच्या किमतींनी मोठी भर घातली आहे. ऑक्टोबरमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कांद्याच्या किमतीत तब्बल 116.22 टक्क्यांची वाढ झाली. सप्टेंबरमध्ये ही वाढ 108.13 टक्के होती. लसणाच्या महागाईचा दर 60.74 टक्के, तर लिंबाच्या किमतीतील वाढ 47.30 टक्के नोंदवण्यात आली आहे.

 

मात्र प्रत्येक भाजी महाग झाली असे नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत बटाट्याच्या किमतीत 14.24 टक्के, तर फुलकोबीच्या किमतीत 10.57 टक्क्यांची घसरण झाली आहे. वांगी आणि कोबीच्या किमतीही कमी झाल्या आहेत.

 

शहरांपेक्षा ग्रामीण भागाला महागाईचा जास्त फटका

 

शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील नागरिकांना महागाईचा अधिक फटका बसला आहे. ग्रामीण भागातील एकूण महागाई दर 6.08 टक्क्यांवरून वाढून 6.63 टक्क्यांवर पोहोचला आहे. येथे खाद्यपदार्थांच्या किमती 9.09 टक्क्यांनी वाढल्या आहेत. दुसरीकडे, शहरी भागातील महागाई दर 5.41 टक्के नोंदवण्यात आला आहे.

 

राज्यांचा विचार केला तर दक्षिण भारतातील राज्यांमध्ये महागाईची परिस्थिती सर्वाधिक गंभीर आहे. तामिळनाडूमध्ये महागाई दर 7.29 टक्के, तेलंगणामध्ये 7.26 टक्के आणि आंध्र प्रदेशात 7.25 टक्के नोंदवण्यात आला आहे. हे आकडे राष्ट्रीय सरासरी 6.09 टक्क्यांपेक्षा खूपच जास्त आहेत.

 

 

RBI पुढे काय निर्णय घेणार? EMI वर काय परिणाम होणार?

 

महागाईचा दर 6 टक्क्यांच्या पुढे गेल्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटमध्ये कपात करण्याच्या योजनेला धक्का बसला आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते, आता डिसेंबरमधील पतधोरण बैठकीत व्याजदर कपातीची शक्यता कमी झाली आहे. उलट व्याजदर वाढवले जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

 

मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार ICRA च्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांच्या मते, महागाई 6 टक्क्यांच्या पुढे गेली असून GDP चा विकासदर 7 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. अशा परिस्थितीत डिसेंबरमध्ये व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्सची वाढ होण्याची शक्यता दिसत आहे.

 

कोटक महिंद्रा बँकेच्या मुख्य अर्थतज्ज्ञ उपासना भारद्वाज यांच्या अंदाजानुसार चालू आर्थिक वर्षात RBI व्याजदरात एकूण 50 बेसिस पॉइंट्सपर्यंत वाढ करू शकते. त्यामुळे आगामी काळात गृहकर्ज आणि वाहन कर्ज घेणाऱ्यांच्या EMI बाबत चिंता वाढू शकते. मात्र, व्याजदरांबाबतचा अंतिम निर्णय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीतच घेतला जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -