भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपनी लावाने ग्राहकांसाठी १०,९९९ रुपये किमतीत ‘लावा स्मार्ट ४ प्रो’ हा नवीन बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. ७०००mAh क्षमतेच्या दमदार बॅटरीसह येणारा हा फोन केवळ ऑफलाइन रिटेल स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला असून तो ऑनलाइन विकला जाणार नाही.
याआधी कंपनीने या सीरिजअंतर्गत ‘लावा स्मार्ट ४’ आणि ‘स्मार्ट ४ प्लस’ हे दोन मॉडेल्स बाजारात आणले आहेत.
लावा स्मार्टफोन ४ प्रो एकाच स्टोरेज व्हेरिएंटमध्ये (४ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज) सादर करण्यात आला आहे, ज्याची किंमत १०,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन नीलम ब्लू आणि कोर्नाक गोल्ड अशा दोन रंगांमध्ये खरेदी करता येईल. विशेष म्हणजे, फोनमध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास कंपनीकडून ‘डोरस्टेप सर्व्हिस’ दिली जाणार आहे; याअंतर्गत कंपनीचे टेक्निशियन थेट ग्राहकाच्या घरी जाऊन फोन दुरुस्त करतील. दरम्यान, लावाने १५ नोव्हेंबरपासून आपल्या अनेक स्वस्त स्मार्टफोन्सच्या किमतीत वाढ केली असून, यावर्षी लॉन्च झालेल्या काही फोन्सच्या किमती ३,००० रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत.
लावा स्मार्ट ४ प्रो: प्रमुख फीचर्स
डिस्प्ले आणि मजबुती: या फोनमध्ये ६.७५ इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला असून, तो ७२० x १५७० पिक्सेल रेझोल्यूशन आणि ९०Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा फोन MIL-STD-810H प्रमाणित असल्याने त्याला मिलिट्री-ग्रेड मजबुती मिळते.
कॅमेरा: फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि सेल्फी व व्हिडिओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
प्रोसेसर आणि स्टोरेज: फोनमध्ये १२nm प्रोसेसिंग तंत्रज्ञानावर आधारित Unisoc T610 4G चिपसेट देण्यात आला आहे. ४ जीबी रॅम व्हर्च्युअल पद्धतीने आणखी ४ जीबीने वाढवता येते, तर मायक्रोएसडी कार्डद्वारे ६४ जीबी स्टोरेज ५१२ जीबीपर्यंत वाढवण्याची सुविधा आहे. हा स्मार्टफोन Android 16 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.
बॅटरी आणि चार्जिंग: यात ७०००mAh ची मोठी बॅटरी असून, ती चार्ज करण्यासाठी १८W फास्ट चार्जिंग आणि यूएसबी टाइप- सी पोर्टचा सपोर्ट देण्यात आला आहे.
कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षा: या फोनमध्ये ड्युअल 4G सिम, Wi-Fi, Bluetooth आणि ३.५mm ऑडिओ जॅक हे पर्याय उपलब्ध आहेत. सुरक्षिततेसाठी फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
