कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघातील अध्यक्षपदाचा वाद अद्याप थांबलेला नाही. चार शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयाला समविचारी आघाडीने न्यायालयात आव्हान दिले आहे.
या प्रकरणावर बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी झाली.
यावेळी न्यायालयाने महायुतीच्या सर्व संचालकांसह चार शासननियुक्त संचालकांना नोटीस बजावून आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अध्यक्ष निवडीच्या सभेचे इतिवृत्त (प्रोसिडिंग) न्यायालयात सादर करण्यास सांगितले. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ डिसेंबरला होणार आहे.
आजच्या सुनावणीत सर्व संबंधित संचालकांपर्यंत नोटीस पोहोचवण्याचा मुद्दा उपस्थित झाला. समविचारी आघाडीचे वकील अॅड. आशुतोष कुंभकोनी यांनी आतापर्यंत महायुतीच्या आठ संचालकांना नोटीस बजावल्याची माहिती न्यायालयाला दिली. यानंतर न्यायालयाने उर्वरित संचालकांनाही सर्व उपलब्ध माध्यमांतून नोटीस पाठवण्यास सांगितले.
नोटीस मिळाल्यानंतरही संबंधित संचालक न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडणार नसतील, तर पुढील सुनावणीवेळी आवश्यक आदेश दिले जातील, असा इशाराही न्यायालयाने दिला. याशिवाय अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडलेल्या सभेचे संपूर्ण इतिवृत्त सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. समविचारी आघाडीकडून अॅड. श्रीकृष्ण गनबावले आणि अॅड. आशुतोष कुंभकोनी यांनी बाजू मांडली. तर महायुतीकडून अॅड. साखरे यांनी युक्तिवाद केला.
दरम्यान, गोकुळ दूध संघाची १० नोव्हेंबरला दुसरी सभा झाली होती. या सभेपूर्वी राज्य सरकारने चार शासननियुक्त संचालकांची नियुक्ती केली आणि त्यांना मतदानाचा अधिकारही दिला. या निर्णयामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे संपूर्ण गणित बदलले होते.
समविचारी आघाडीकडे संचालकांचे बहुमत असूनही त्यांना अध्यक्षपद मिळू शकले नाही. सभेचा कोरम पूर्ण करण्यासाठी १४ संचालकांची आवश्यकता होती. महायुतीकडे १२ संचालक असताना शासननियुक्त चार संचालकांच्या मतदानामुळे त्यांचे पारडे जड झाले. अखेर या निवडणुकीत महायुतीचे राजेश पाटील अध्यक्षपदी निवडून आले.
या निर्णयाविरोधात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली समविचारी आघाडीने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यामुळे आता ३ डिसेंबरच्या सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते, याकडे गोकुळच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
